शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार असतील तर सर्व सोपस्कार पूर्ण करून ज्यांनी अधिकृतरीत्या बांधकामे करून घेतली त्यांचे पाप काय आणि अनधिकृत बांधकामे पुण्यात चटई क्षेत्र निर्देशांकाचा (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) जो बेसुमार वापर करण्यात आला आहे तोही शासन अधिकृत करणार का, असे दोन प्रश्न पुण्यात विचारले जात आहेत. शहरात ४० हजार बांधकामे अनधिकृत आहेत, असे महापालिका प्रशासन म्हणत असले तरी ज्यांना करआकारणीच होत नाही अशा बांधकामांची संख्या दोन लाख एवढी असल्यामुळे अनधिकृत बांधकामांचा आकडा फार मोठा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाने नेमलेल्या सीताराम कुंटे समितीने काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकामांचा जो आढावा घेतला त्यात पुणे शहरात ४० हजार अनधिकृत बांधकामे असल्याचा अहवाल महापालिकेने समितीला दिला होता. राज्य शासनाच्या निर्णयामुळे ही बांधकामे सरळसरळ नियमित होतील. मात्र प्रत्यक्षातील आकडा यापेक्षा खूप मोठा आहे. शहरात झोपडपट्टी वगळता एकूण सुमारे आठ लाख मिळकती आहेत. त्यातील किमान दोन लाख मिळकतींना मिळकत कराची आकारणीच होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या मिळकतींना कर लागलेलाच नाही अशा मिळकतींमधील तीस ते चाळीस टक्के मिळकती या अनधिकृत आहेत. या मिळकती बांधताना महापालिकेकडे परवानगीच मागण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या कर रचनेच्या जाळ्यात आलेल्या नाहीत. ही संख्या आणि महापालिकेने निश्चित केलेली ४० हजार ही संख्या पाहता पुण्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या फोर मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनधिकृत बांधकामे करताना पुण्यात आणि मुख्यत: शहराच्या परिसरात एफएसआयचाही बेसुमार वापर करण्यात आला आहे. समाविष्ट गावांमध्ये तर हे प्रमाण लक्षणीय आहे. एक ऐवजी दोन, तीन, चार आणि काही ठिकाणी आठ एफएसआय वापरून बांधकामे करण्यात आली आहेत. या एफएसआय वापराबाबत वेळोवेळी आक्षेपही नोंदवण्यात आले होते आणि ही बांधकामे अनधिकृत आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार अनधिकृत बांधकामे नियमित करताना मोठय़ा प्रमाणावर एफएसआय वापरून केलेली बांधकामेही नियमित होणार असतील, तर ज्यांनी नियमानुसारच एफएसआय वापरून बांधकामे केली त्यांचे काय, असाही प्रश्न या निर्णयामुळे विचारला जात आहे.

अनधिकृतांवर दृष्टिक्षेप..
पुणे- अनधिकृत बांधकामे- ४० हजार
करआकारणी होत नसलेली बांधकामे- दोन लाख
अनधिकृत बांधकामांमध्ये दोन ते आठ एवढा एफएसआयचा वापर