पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. मुंबई आणि उपनगरांमध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाचा शिडकावा झाला.

मुंबईतील पश्चिम उपनगरांत आणि नवी मुंबईत संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आला. बेलापूर येथे ५.९ मिमी, शहाडजवळ एक मिमी पावसाची नोंद झाली.  सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जालन्यासह विदर्भात काही ठिकाणी गारपीट झाली, तर इतर भागांना वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे द्राक्षासह अन्य फळबागा आणि रब्बी पिके संकटात सापडली आहेत. राज्यात पावसाचा हा सलग चौदावा महिना ठरला असून, गेल्या वर्षीही फेब्रुवारीमध्येच गारपीट झाली होती.

उत्तर कर्नाटक ते विदर्भापर्यंत बुधवारी कमी दाबाचा पट्टा होता. तो आता उत्तर केरळ किनारपट्टी ते दक्षिण मध्य महाराष्ट्रावर कार्यरत झाला आहे. त्यामुळे या पट्टय़ासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक आदी जिल्ह्य़ांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडय़ातील जालना, औरंगाबाद, नांदेड आदी भागांत पाऊस पडला. विदर्भात बुलढाणा, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली.

पश्चिम महाराष्ट्रात पिकांचे नुकसान

गारपिटीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्य़ात रब्बी पिकांना मोठा फटका बसला. शिवाय पावसाने ऐन भरात असलेल्या द्राक्षबागांसह पपई व अन्य फळबागा संकटात सापडल्या.  वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कराड, पाटण तालुक्यात या पावसाचा जोर मोठा होता. काही ठिकाणी गारपीटही झाल्याचे वृत्त आहे.

मराठवाडय़ातही गारपीट

मराठवाडय़ातील जालना, नांदेड औरंगाबाद भागाला अवकाळी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्य़ातील बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांसह आंब्याच्या मोहोराचे नुकसान झाले.

भोकरदन तालुक्यात कांद्याच्या बियाणांची लागवड करून मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या पिकाचेही नुकसान गारपिटीने झाले. हरभरा, गहू, ज्वारी, मिरची, कांदा आदी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नांदेड जिल्ह्य़ातील  चिंचखेड येथे गुरुवारी दुपारी वीज पडून आनंदराव श्यामराव चव्हाण (वय ६५) या वृद्धाचा मृत्यू झाला.

आजही पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी शुक्रवारीही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातही काही ठिकाणी पाऊस होणार आहे. २० फेब्रुवारीनंतर मात्र पावसाळी स्थिती दूर होऊन हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत आंब्याला फटका

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे मोहरलेल्या आंब्याचे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील भाजी लागवडीलाही फटका बसला आहे. संगमेश्वरमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर होता. या पावसामुळे आंब्याच्या हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. झाडांवरील मोहोर गळून गेला आहे. पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.

नाशिकमध्ये द्राक्षांचे नुकसान

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तडाखा दिल्याने नाशिकमध्ये काढणीवर आलेल्या द्राक्षांसह कांदा आणि अन्य पिकांची हानी झाली. बागलाण आणि दिंडोरीच्या काही भागात गारांचा अक्षरश: खच पडला. सिन्नरच्या पांढुर्ली भागात बागांमधून पाण्याचे लोट वाहात होते. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.