देशात तरुणांना वयाच्या तिशीतच हृदयविकार होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढला असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशपातळीवर झालेल्या या सर्वेक्षणात ३० ते ३४ या वयोगटातील तब्बल ७३ टक्के पुरुषांना, तर ५८ टक्के स्त्रियांना हृदयविकाराचा धोका असल्याचे दिसून आले.
‘सफोला लाइफ’ या संकेतस्थळाने हे सर्वेक्षण केले आहे. २०१० ते २०१३ या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात देशातील १ लाख ८६ हजार व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या सर्व व्यक्ती तीस वर्षांवरील होत्या. धूम्रपान, वाढते वजन, वाढते कोलेस्टेरॉल आणि ‘हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन’ ची (गुड कोलेस्टेरॉल) कमी होणारी पातळी ही ३० ते ३४ या वयोगटात हृदयरोगाचा धोका वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
तरुण वयातील व्यक्तींमध्ये धूम्रपानाबरोबरच तंबाखू व गुटख्याच्या सेवनाचे वाढते प्रमाण, तसेच हुक्का पार्लर्सची वाढती लोकप्रियता हृदयरोगाचे प्रमुख कारण ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ट्रान्स फॅट अधिक असलेले पदार्थाचे वारंवार सेवन करण्यामुळे ट्रायग्लिसराईड्स आणि ‘लो डेन्सिटी लिपोप्रोटिन’ चे (बॅड कोलेस्टेरॉल) प्रमाण वाढते, तर चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे व्यसनांच्या जोडीला व्यायामाचा अभाव आणि फास्टफूडचे वाढते सेवनही हृदयरोगास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अविनाश इनामदार म्हणाले, ‘‘आहारात बी-६, बी- १२ (बी काँप्लेक्स) या जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तातील ‘होमोसिस्टेन’ या घटकाचे प्रमाण वाढते. तसेच कॉफीचे अतिसेवनही या घटकाचे रक्तातील प्रमाण वाढवते. हा घटक वाढल्यामुळे हृदयरोगाचा आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. बी काँप्लेक्स जीवनसत्त्वांसाठी आहारात पालेभाज्यांचा नियमित समावेश होणे गरजेचे आहे. शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी औषधांचा फारसा उपयोग होत नाही. दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करणे हाच त्यावर उपाय आहे. अशाप्रकारे वाढवलेली चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी अधिक टिकते व हृदयरोगाला प्रतिबंध करायला मदत करते.’’
संकेतस्थळाच्या सर्वेक्षणानुसार देशातील अहमदाबाद, हैद्राबाद आणि कोलकाता या ठिकाणच्या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका असण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७४ टक्के आहे, तर मुंबई आणि पुणे या ठिकाणी हे प्रमाण ७२ टक्के आहे. चंढीगड आणि दिल्लीतील व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५४ टक्के आहे. मुंबईतील ४८ टक्के, तर पुण्यातील ४९ टक्के व्यक्ती लठ्ठ (बॉडी मास इंडेक्स २५ च्या वर असणाऱ्या) आहेत.
व्यायामात पुणे आघाडीवर!
पुणे आणि बंगळुरू येथील नागरिक नियमित व्यायाम करण्यात देशात आघाडीवर असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे, तर अहमदाबाद व्यायामात सर्वात मागे आहे. पुण्यातील ५९ टक्के व्यक्ती आठवडय़ात ० ते ३ वेळा व्यायाम करतात. ३० टक्के व्यक्ती आठवडय़ात ४ ते ६ वेळा व्यायाम करतात, तर ११ टक्के व्यक्ती ७ किंवा अधिक वेळा व्यायाम करतात.