काम चांगलं झालं तर किरकोळ चुका देखील पोटात घेऊ, पण कामं झाली नाहीत, तर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना प्रेमळ भाषेत भरला.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आज पुण्यात एसआरए प्रकल्पाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे भाडे महिन्याला १२ लाख रुपये आहे. त्यामुळे या कार्यालयात येणार्‍या प्रत्येक सर्व सामान्य नागरिकाचे समाधान होईल. असे काम करा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी अधिकारी वर्गाला दिला.

तसेच ते पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी फार नियमांवर बोट ठेऊन चालू नये, त्यातून व्यवहारी मार्ग काढा, मी तर आता झोपूंच्या प्रकल्पांचा दर आठवड्यालाच आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे विद्यापीठ चौकातील एक दोन उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने बांधले गेल्याचं अनेकांचे म्हणणे आहे. त्यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.