पिंपरी पालिकेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून शालेय साहित्य खरेदी करण्याचे शिक्षण विभागाचे विषयपत्र मागे घेण्याची नामुष्की आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर गुरुवारी ओढावली. याप्रकरणी त्यांनी स्थायी समितीत दिलगिरी व्यक्त केली.

शिक्षण विभागामार्फत २०१९-२० या आर्थिक वर्षांत बालवाडी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय वह्य़ा, अभ्यासपूरक पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचे दोन स्वतंत्र विषय स्थायी समितीसमोर होते. दोन्ही मिळून अडीच कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावावरून बरेच दिवस अर्थकारण सुरू होते.

वाकडचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी, आयुक्तांना दिलेल्या पत्रात विविध मुद्दे उपस्थित करून या प्रस्तावातील उणिवा दाखवून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यानंतर आयुक्तांनी हे दोन्ही प्रस्ताव मागे घेतल्याचे सांगितले. प्रशासनाकडून याबाबत चूक झाली असून ती मान्य असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. या संदर्भात, मयूर कलाटे यांनी पत्रकारांना सांगितले की, शिक्षण विभागाच्या या प्रस्तावांवर तीव्र आक्षेप नोंदवले होते. त्याची दखल घेऊन हे विषयपत्र चुकीचे असल्याचे मान्य करत आयुक्तांनी ते मागे घेतले आहे.

सभेत पंडित जसराज, इंदोरी यांना श्रद्धांजली

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज, प्रसिद्ध शायर राहत इंदोरी, पिंपरीचे माजी महापौर रंगनाथ फुगे, नगरसेवक जावेद शेख आदींना श्रद्धांजली वाहून पिंपरी पालिकेची सभा गुरुवारी तहकूब करण्यात आली. महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पक्षनेते नामदेव ढाके यांनी श्रद्धांजली सूचना मांडली, त्यास मोरेश्वर शेडगे यांनी अनुमोदन दिले. शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दुपारी ही सभा होईल, असे महापौरांनी जाहीर केले.