पुणे : शहरात पुन्हा टाळेबंदी लागू झाल्यानंतर रस्त्यावर  शुकशुकाट जाणवत असला तरी दररोज सायंकाळी पतंगबाजी मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. रस्त्यावर फारशी गर्दी नसली तरी पतंग कापला गेल्यानंतर पतंगाच्या मांजामुळे दुचाकीस्वार नागरिक तसेच पक्ष्यांना इजा होऊ शकते.

पतंगबाजीमुळे गेल्या काही वर्षांत शहरात गंभीर स्वरूपाच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. बेजबाबदारपणे पतंग उडविणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. टाळेबंदी लागू झाल्यानंतर सध्या अनेक जण घरीच आहेत. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी अनेकांनी पतंग, मांजाची खरेदी केली.

गेल्या महिनाभरापासून शहरातील र्निबध शिथिल झाल्यानंतर दररोज सायंकाळनंतर पतंगबाजी सुरू होते. सध्या शाळांना सुटी आहे, तसेच खासगी कार्यालयातील कामकाजातही बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक जण सायंकाळी सहकुटुंब इमारतीच्या छतावर पतंग उडविण्यासाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरातील मध्य भागातील पेठा तसेच पूर्वभागात मोठय़ा प्रमाणावर सायंकाळनंतर पतंगबाजी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. डेक्कन भागातील गाडगीळ पुलावर (झेड ब्रीज) मोठय़ा संख्येने युवकांचे घोळके जमतात. त्यानंतर तेथे पतंगबाजी सुरू होते.

शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली असली तरी पतंग  उडविणाऱ्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. पतंग कापल्यानंतर पतंग पकडण्यासाठी लहान मुले धावत असतात. कापलेल्या पतंगातील मांजा तारा आणि झाडांवर अडकून पडतो. मांजात अडकल्याने पक्ष्यांनाही इजा होते. पतंगबाजीमुळे पादचारी नागरिक आणि दुचाकीस्वारांना गंभीर स्वरूपाची इजा होण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे. पतंगबाजांवर कारवाई केल्यास गंभीर स्वरूपाच्या दुर्घटना टळतील, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. शिवाजी पुलावर दोन वर्षांपूर्वी एका दुचाकीस्वार महिलेचा मांजामुळे गळा चिरल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

पतंग उडविण्याच्या प्रकारांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी शहरात मांजाने नागरिकांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेजबाबदारपणे पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसे आदेश देण्यात आले आहेत.

– स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १