15 August 2020

News Flash

थॅलेसेमिया रुग्णांना ‘बंद’चा फटका

औषधे, रक्त तातडीने उपलब्ध होणे आवश्यक

संग्रहित छायाचित्र

बंदचा फटका अनेक घटकांना बसत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे राज्यातील सुमारे ४५,००० थॅलेसेमियाचे रुग्ण हा होय. थॅलेसेमियाच्या रुग्णांना आपले आरोग्य राखण्यासाठी गरजेची असलेली औषधे किंवा रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे या सगळ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

थॅलेसेमिया या रक्तविकाराचा सामना करणारे  ४५,००० रुग्ण राज्यात आहेत. त्यातील १५,००० रुग्ण औषधांवर गुजराण करतात. उर्वरित रुग्णांना दर पंधरा दिवसांनी नवे रक्त चढवणे हा या आजारावरचा एकमेव उपाय आहे. करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध म्हणून देशभर सुरू असलेल्या बंदमुळे या रुग्णांना रक्त आणि औषधे या दोन्हींचा तुटवडा जाणवत आहे. ही समस्या योग्य वेळी सुटली नाही, तर रुग्णांच्या जिवावर बेतण्याचा धोका समोर उभा आहे.

महाराष्ट्र थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम म्हणाले, राज्यातील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची अडचण मोठी आहे. करोनामुळे नियमित होणाऱ्या रक्तदानावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रक्तपेढय़ांकडे पुरेसा रक्तसाठा नाही. दुसरीकडे बाजारात भरपूर औषधे उपलब्ध आहेत, मात्र सहा किंवा चार महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी जुनी झाली म्हणून औषधे आणायला जातो हे कारण बंदच्या काळात मान्य केले जात नाही. काही ठिकाणी पोलिसांचे समंजस अनुभव येतात, मात्र ते कमी असतात, आणि ते स्वाभाविक आहे. आम्ही सरकारला विनंती करतो, की स्पीडपोस्ट सारखी सुविधा औषधे पोहोचवण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून रुग्णांपर्यंत औषधे पोहोचवणे शक्य होईल.

रक्तविकार तज्ज्ञ डॉ. विजय रमणन म्हणाले, थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये रक्तातील लोह सातत्याने कमी होत असते. औषधे किंवा रक्त संक्रमण हे दोनच उपाय उपयुक्त ठरतात. योग्य वेळी औषधे किंवा रक्त मिळाले नाही तर हृदय, यकृत, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. यात रुग्णाचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे अत्यावश्यक बाब म्हणून सरकारने याकडे पाहावे. औषधे स्पीडपोस्टने पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

रक्तदानासाठी मोठय़ा संख्येने पुढे या!

सद्य:स्थितीत रक्तदानाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. हे तातडीने वाढले असता थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ते वरदान ठरेल, त्यामुळे बंदच्या काळात घरी असलेल्या निरोगी व्यक्तींनी कृपया रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. रमणन यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:56 am

Web Title: lock down affect on thalassemia patients abn 97
Next Stories
1 Coronavirus : पुण्यात आजोबांमुळे तीन वर्षांच्या नातीला करोनाची बाधा
2 Coronavirus : पुण्यात दुसरा बळी, ससून रूग्णालयात महिलेचा मृत्यू
3 Coronavirus : देशाला वाचवण्यासाठी तरुणांचीही धडपड; तयार केले स्वस्तातील व्हेंटिलेटर्स
Just Now!
X