पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी व तीन जागांसाठी सक्षम उमेदवारांचा शोध पक्षाकडून सुरू करण्यात आला आहे.

शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीचे तीनही आमदार होते. सद्य:स्थितीत दोन भाजपचे व एक सेनेचा आमदार आहे. शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांच्या जाळे चांगले आहे. २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा अनेक उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर होते. मात्र, मनसे नेत्यांनी कधीही पिंपरी-चिंचवडकडे लक्ष दिले नाही म्हणून मनसेची अपेक्षित वाढ शहरात झाली नाही. पालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सध्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले हे एकमेव नगरसेवक निवडून आले.

मनसेचे मुंबईतील नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी नुकताच पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. पक्षकार्याचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्याशी त्यांनी संवादही साधला. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे तक्रारीचा पाढा मांडला.

पिंपरी चिंचवडमधील मनसे कार्यकर्त्यांना वरिष्ठांकडून ताकद मिळत नाही, पदांचे वाटप होत नाही, महिला अध्यक्ष नियुक्त करण्यात आलेला नाही, दोन शहराध्यक्ष आहेत, त्यापैकी एक कामच करत नाही, पक्षप्रमुख राज ठाकरे पुण्यात येतात, मात्र पिंपरीत येत नाहीत, अशाप्रकारचे मुद्दे कार्यकर्त्यांनी नांदगावकर

यांच्यासमोर मांडले. सर्वाचे समाधान करण्याचा प्रयत्न नांदगावकर यांनी केला. शहरात लक्ष घालून पिंपरी पालिकेतील कारभाराविषयी तसेच नागरी प्रश्नांसाठी मोठे आंदोलन उभारण्याचे सूतोवाच त्यांनी बैठकीत केले. त्यादृष्टीने मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असल्याचे दिसून येते.