पुणे शहरात पोलिसांवर चोरटय़ांनी केलेला गोळीबार तसेच महिला पोलिसांच्या विनयभंगाच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर विधानपरिषदेत आवाज उठविणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुणे शहरात पाषाण भागात सूस खिंडीतील टेकडीवर चोरटय़ांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केला. तसेच, बुधवार पेठ आणि वडगांव शेरी भागात दोन महिला पोलिसांना धक्काबुक्की करुन त्यांचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी संपर्क साधला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रश्नी विधानपरिषदेत आवाज उठविणार असल्याची माहिती डॉ.गोऱ्हे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. सांस्कृतिक शहरात घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना लांच्छनास्पद आहेत. पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांची गय करु नका. पोलीस समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना साधनसामुग्री  आणि मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत मी पाठपुरावा करणार आहे, असे डॉ.गोऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.