वय वर्षे ५ ते ८२ वर्षांपर्यंतच्या मुले आणि स्त्री-पुरुष अशा साडेसातशेहून अधिक नागरिकांचा सहभाग.. सूर्याच्या बारा नामांच्या मंत्रोच्चारात शेवटचे ५० सूर्यनमस्कार घालून अखंड २४ तास सूर्यनमस्कार घालण्याच्या ‘आदित्ययाग’ या उपक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते.
चैतन्य योग साधना संस्थेतर्फे शनिवार पेठ येथील गोकुळ हॉल येथे आयोजित आदित्ययाग उपक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यां सुधा लेले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. सूर्यदेवतेस सूर्यनमस्काररूपी आहुती देण्यासाठीच्या अखंड २४ तास सूर्यनमस्कार उपक्रमामध्ये ७० हजारांहून अधिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. सारंग अमित जोशी आणि मोहिनी कुलकर्णी या पाच वर्षांच्या मुलांनी शंभर सूर्यनमस्काराचे लक्ष्य पूर्ण केले. २५ वर्षांच्या एका युवकाने सर्वाधिक १२०० सूर्यनमस्कार घातले. तर, यामध्ये सहभागी झालेली ज्येष्ठ व्यक्ती ८२ वर्षांची होती.
सूर्यनमस्कार आणि योगोपचाराच्या प्रचारासाठी ‘आदित्ययाग’ हा उपक्रम राबविला जातो. सूर्यनमस्कार हा सर्वागीण व्यायाम असून सर्व वयोगटातील महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयोगी असल्याचे चैतन्य योग साधना संस्थेचे संस्थापक श्रीराम साठय़े यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले.