नारायणगावातील कृषी विज्ञान केंद्राच्या तपासणीत स्पष्ट

नारायणगाव : उन्हाळी हंगामात लागवड झालेल्या टोमॅटोच्या पिकावर पाच प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात यंदाच्या हंगामात तीन हजार एकरवर टोमॅटोची लागवड झालेली आहे. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेने या भागातील टोमॅटोच्या पिकांची तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. केंद्राचे प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी याबाबतची माहिती दिली.

गेल्या १५ दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांकडून विषाणूजन्य रोगांबद्दल तक्रारी येत असल्याने कृषी विभागाचे जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी संयुक्तपणे जुन्नर तालुक्यातील येडगाव, नारायणगाव, रोहकडी, हिवरे तर्फे नारायणगाव तसेच आंबेगाव तालुक्यातील अवसरी, गावडेवाडी या ठिकाणी भेटी देऊन कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने येडगावमधून रोगग्रस्त झाडे आणि फळे तपासणीसाठी दिली असता त्यामध्ये एकूण पाच प्रकारचे विषाणू आढळून आले.

प्रशांत शेटे आणि पीक संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले की, ३१ मे रोजी रोगग्रस्त टोमॅटोची फळे, झाडे पुणे येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या क्षेत्रीय कार्यालयात तपासणीसाठी दिली होती. तेथे वेगवेगळ्या १० विषाणूची चाचणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटोवर येणारे ‘कुंकबर मोझक’, ‘ग्रांउडनट बड नेक्रॉसीस’,  ‘कॅप्सीकम क्लोरासीस’, ‘पॉटी व्हायरस’, ‘पोटॅटो व्हायरस एक्स’ या प्रकारच्या रोगांचे विषाणू सापडले आहे.

पिकांची फेरपालट आवश्यक

पिकांवरील सर्व विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, रसशोषक किडींमुळे होतो. परिणामी या सर्व विषाणूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत असून रसशोषक किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. टोमॅटो बाग स्वच्छ आणि गवत विरहित ठेवणे गरजेचे असून, शेतकऱ्यांनी सामूहिक कीड नियंत्रण करणे अपेक्षित आहे, असे विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रमुख प्रशांत शेटे यांनी सांगितले.