महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांची उपस्थिती तशी कमीच कमी असते. तरीही उपस्थितीपत्रकावर मात्र बहुतांश नगरसेवकांची स्वाक्षरी असते. अशा प्रकारावर र्निबध आणण्यासाठी नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद अचूकरीत्या व्हावी या उद्देशाने नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे करण्याचा प्रस्ताव होता. सभागृहाच्या अत्याधुनिकीकरणाचा लाभ घेणाऱ्या नगरसेवकांनी अचूक हजेरीला मात्र विरोध केला आहे.
पुणे महापालिकेच्या सभागृहाचे नूतनीकरण पाच महिन्यांपूर्वी झाले. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यात आसनव्यवस्थेतील बदलांसह, अत्याधुनिक ध्वनिवर्धक यंत्रणा, तसेच सभागृहात स्क्रीन, सुशोभीकरण आदी अनेक कामांचा समावेश होता. त्या प्रमाणे ही कामे करण्यात आली असून याच कामांमध्ये नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद अचूकरीत्या व्हावी यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याच्या कामाचाही समावेश होता. प्रत्यक्षात मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत उत्सुकता दाखवली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.
नगरसेवक सभेत येतानाच प्रवेशद्वारात ठेवलेल्या हजेरी पुस्तकात स्वाक्षरी करतात. सभेत १५७ पैकी ८० ते ९० नगरसेवकच नियमितपणे उपस्थित असतात. अनेक नगरसेवक सभेत फक्त स्वाक्षरी करण्यापुरते येतात, तर अनेक नगरसेवक एखाद्याच दिवशी सभेत येतात आणि चार-पाच दिवसांच्या स्वाक्षऱ्या करतात. त्यामुळे नगरसेवकांच्या खऱ्या उपस्थितीची नोंद हजेरी पुस्तकात होत नाही. यावर उपाय म्हणून बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे उपस्थितीची नोंद करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार कार्यवाही सुरू देखील होणार होती. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी नगरसेवकांच्या बोटांचे ठसे घेणे आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत उदासीनता दाखवण्यात आल्यामुळे उपस्थितीच्या नोंदीची ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सभागृहाच्या प्रवेशद्वारातच हे यंत्र बसवले जाणार होते.
 महापालिका सभेला शिस्त यावी तसेच त्यातील कामकाज योग्यप्रकारे व नियमानुसार चालावे यासाठी सध्याच्या सभा कामकाज नियमावलीतही सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या सुधारणांतर्गत नगरसेवकांच्या उपस्थितीबाबतही निर्णय होईल, असे आता सांगितले जात आहे. मात्र, बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष हजेरी कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे.