वेगवान रेल्वेला राज्य शासनाचे प्राधान्य

मुंबई / नाशिक : वर्षांनुवर्षे चर्चेत असलेल्या पुणे ते नाशिक या रेल्वे मार्गाला राज्य सरकारने प्राधान्य दिले असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्यकर्त्यांनी दिल्याने हा रेल्वे प्रकल्प मार्गी लागावा, अशी अपेक्षा दोन्ही शहरांमधून व्यक्त के ली जाते. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यावर या दोन शहरांमधील अंतर दोन तासांपेक्षा कमी वेळेत गाठता येईल.

पुणे-नाशिक वेगवान रेल्वे प्रकल्प हा पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्य़ांमधून जाणार आहे. मुंबई-पुणे-नाशिक हा त्रिकोणी पट्टा अधिक विकसित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पुणे ते नाशिक हा दळणवळणाच्या दृष्टीने विकसित झालेले नाही. यामुळेच राज्य सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. कोणतेही अडथळे न आल्यास चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, अशी हमी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या कामासाठी १३ हजार ७०० कोटी तर भूसंपादनासह इतर खर्च मिळून सुमारे १६ हजार कोटी रुपये लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. यात राज्य सरकारचा २० टक्के  आणि रेल्वेचाही २० टक्के  वाटा असेल. बाकी ६० टक्के  रक्कम वित्तीय संस्थांकडून उभी के ली जाईल. भूसंपादनातही राज्य सरकारचे सहकार्य रेल्वेला लागणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात २५ हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.

पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्य़ांतील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.  पावणेदोन तासांत हे अंतर कापले जाणार आहे.

कृषी, औद्योगिक विकासास बळ

* प्रदीर्घ काळ रखडलेला नाशिक-पुणे जलद दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प वेळेत प्रत्यक्षात आल्यास दोन्ही औद्योगिक शहरांना जोडणारा किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेने माल वाहतूक स्वस्त असते. त्याचा लाभ उद्योगांसोबत कृषिमाल, वाइनसह सर्वच घटकांना होईल. दक्षिण भारताशी नाशिकचा संपर्क विस्तारणार आहे. नाशिक-पुणे रस्त्याचे चौपदरीकरण प्रगतिपथावर असले तरी काही टप्प्यात ते काम रखडलेले आहे. राजगुरू ते पुणे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी असते. नाशिक-पुणे रेल्वेमार्गामुळे त्यातून प्रवाशांची सुटका होऊ शकते.

* महारेलच्या वतीने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे घोंगडे बराच काळ भिजत पडले आहे. अंदाजपत्रकात रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद होण्यापुरताच तो आजवर मर्यादित राहिला. या मार्गासाठी अनेकदा सर्वेक्षण झाले. अहवाल सादर झाले. परंतु, रेल्वे मार्गाची गाडी काही पुढे सरकत नव्हती. नाशिक, पुणे वाहन उद्योगांचे केंद्रबिंदू. दोन्ही भागात कृषी उत्पादन विपुल प्रमाणात होते. अन्न प्रक्रिया उद्योगांचे मोठे जाळे आहे. या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी उद्योजकीय संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटना पाठपुरावा करत होते. जलद रेल्वे प्रकल्प नाशिक, पुण्याप्रमाणे अहमदनगरसाठी तितकाच उपयुक्त ठरणार आहे. याद्वारे नाशिक-पुणे हे अंतर पावणेदोन तासात कापले जाईल. सध्या या रेल्वे प्रवासासाठी जवळपास सहा तास लागतात. प्रवाशांच्या आग्रहास्तव काही वर्षांपूर्वी रेल्वेने नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी सुरू केली. ती गाडी कल्याण, पनवेल, कर्जतमार्गे ये-जा करते. या प्रवासाला बराच वेळ लागत असल्याने तिला फारसा प्रतिसाद मिळत नाही. थेट रेल्वे मार्गामुळे सध्याचा कंटाळवाणा रेल्वे प्रवास संपुष्टात येईल.

ठळक वैशिष्टय़

* २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग.

* पुणे जिल्हा – ११३ किमी, नाशिक – ६४ किमी, नगर – ५८ किमी.

* रेल्वेचा वेग २०० किलोमीटर प्रति तास. पुढे हा वेग २५० कि.मी. पर्यंत वाढविणार.

* पुणे-नाशिक अंतर अवघ्या पावणेदोन तासांत कापणार.

* पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी.

* १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल, १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित.

* सुरुवातीला गाडीला सहा डबे असतील. भविष्यात १२ ते १६ पर्यंत संख्या वाढविता येईल.

* पुणे शहरातील रेल्वे स्थानकापासून हडपसपर्यंत उन्नत मार्ग, पुढे नाशिकपर्यंत रेल्वेचे रूळ जमिनीला समांतर.

* सुमारे दीड हजार हेक्टर्स जमिनीचे संपादन करावे लागणार.

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. या रेल्वे मार्गाने चाकण, सिन्नर ही औद्योगिक क्षेत्रे जोडली  जातील. स्वस्तात औद्योगिक माल वाहतुकीची प्रदूषणमुक्त व्यवस्था उपलब्ध होईल. नाशिकला दक्षिण भारताशी जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सिन्नर, संगमनेर, चाकणपर्यंतच्या भागाचा विकास होईल.

– अभय कुलकर्णी (नाशिक फर्स्ट)

कोणत्या तालुक्यांतून नियोजित रेल्वे मार्ग जाणार?

* पुणे जिल्हा – हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर

* नगर जिल्हा – संगमनेर

* नाशिक जिल्हा – नाशिक आणि सिन्नर