नव्या टाळेबंदीत मीटर वाचनातून अचूक देयकांचा दावा

पुणे : पहिल्या संपूर्ण टाळेबंदीमध्ये वीज मीटरचे वाचन (रिडिंग) बंद असल्याने सरासरी देयके दिल्यानंतर मोठय़ा संख्येने आलेल्या तक्रारी आणि निर्माण झालेल्या शंका महावितरणसह ग्राहकांना डोकेदुखी ठरल्या होत्या. आता पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरात पुन्हा संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्यानंतर सुमारे २० लाख ग्राहकांच्या वीज देयकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, या टाळेबंदीत वीज मीटरचे वाचन होणार असून, त्यानुसारच ग्राहकांना अचूक देयके दिली जाणार असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा सरासरी वीज देयकांची डोकेदुखी तूर्त  टळली आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर मार्चच्या अखेरीस कठोर टाळेबंदी लागू झाल्यानंतर महावितरणनेही घरोघरी जाऊन वीज मीटरचे वाचन बंद केले होते. जूनमध्ये टाळेबंदीत काही प्रमाणात सवलत दिल्याने जूनपासून पुन्हा वीज मीटरचे प्रत्यक्ष वाचन सुरू करण्यात आले. दरम्यानच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीसाठी ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार देयके देण्यात आली. ती देताना मार्चपूर्वीच्या तीन महिन्यांचा म्हणजेच हिवाळ्यातील वीज वापर गृहीत धरण्यात आला होता. प्रत्यक्ष वीज वापर होत असताना उन्हाळा होता आणि टाळेबंदीत सर्व जण घरी असल्याने वापरही वाढला होता. त्यामुळे प्रत्यक्ष मीटर वाचन करून एकत्रित देयके काढल्यानंतर ती मोठय़ा रकमेची आली. त्यातून ग्राहकांकडून अनेक तक्रारी आणि शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

सरासरी वीज देयकांच्या तक्रारींमुळे गोंधळाची स्थिती होती. आता १० दिवस पुणे आणि िपपरी-चिंचवडमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मीटरचे वाचन करण्याच्या कालावधीतच ही टाळेबंदी आहे. त्यामुळे आताही वाचन न करता सरासरी देयके पाठविण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. या दोन्ही शहरांमध्ये सुमारे २० लाखांच्या आसपास घरगुती वीज ग्राहक आहेत. सध्याच्या टोळेबंदीत मीटर वाचन सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मीटरचे वाचन करूनच  देयके काढण्यात येणार असल्याने सरासरी देयकांचा प्रश्न राहणार नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र सरासरीच देयके

करोनाचे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळून येत असलेले पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या क्षेत्रामध्ये वीज मीटरचे वाचन होणार नाही. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना सरासरीनुसारच वीज देयके देण्यात येणार असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वी प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या, पण आता वगळलेल्या क्षेत्रात मीटर वाचन सुरू करण्यात आले आहे. नव्याने प्रतिबंधित असलेल्यांमध्ये ते बंद करण्यात येत आहे. पूर्वीपासूनच प्रतिबंधित असलेल्या भागांमध्ये मात्र चार ते पाच महिन्यांपासून सरासरीच देयके पाठविण्यात येत आहेत. हे भाग प्रतिबंधितमधून काढल्याशिवाय तेथे मीटर वाचन होणार नाही.

वीज ही अत्यावश्यक सेवेत असल्याने सध्याच्या टाळेबंदीत ग्राहकांच्या मीटरचे वाचन करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना महिन्याची देयके पाठविली जातील. मात्र, मीटर वाचनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

– सचिन तालेवार, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल.