कोंढव्यातील लुल्लानगर भागातील घटना; तिघे अटकेत

बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा लावण्याच्या वादातून संगणक अभियंता तरुणाला लोखंडी गजाने बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना लुल्लानगर परिसरातील सहानी सुजाण पार्क भागात शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

नेवल बोमी बत्तीवाला (वय ३१, रा. सहानी सुजाण पार्क, लुल्लानगर, कोंढवा) असे खून झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश जयवंतराव रासकर (वय ३१), योगेश दिनू कडवे (वय २२, दोघे रा. मोहित टॉवर, सहानी सुजाण पार्क, लुल्लानगर, कोंढवा), विक्रम लक्ष्मण भोंबे (वय ३२, रा. रासकर पॅलेस मागे, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. पोलीस हवालदार मुनीर अब्बास इनामदार यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रासकर, कडवे, भोंबे हे नेवल यांच्या बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा लावायचे. या कारणावरून त्यांच्यात यापूर्वी वाद झाला होता.

आरोपींनी शुक्रवारी नेवल यांच्या बंगल्यासमोर गाडी लावली. या कारणावरून नेवल यांनी आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी असल्याचे नेवल यांना सांगितले. नेवल यांनी आरोपींकडे ओळखपत्राबाबत विचारणा केली. नेवल आणि आरोपींमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी लोखंडी गजाने नेवल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना दगड फेकून मारला. नेवल गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या नेवल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नेवल यांचा पहाटे मृत्यू झाला. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. सोनवणे तपास करत आहेत.