सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १७ लाख रुपयांच्या वार्षिक अंदाजपत्रकापासून सुरू झालेला प्रवास गेल्या चौसष्ट वर्षांत ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थसंकल्पापर्यंत जाऊन पोहोचला आहे. पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी, दीडशे कोटी रुपयांपर्यंत फक्त परीक्षा शुल्क, असा विद्यापीठाचा जामानिमा झाला आहे.
पुणे विद्यापीठ हे राज्यातील श्रीमंत विद्यापीठ आहे. यावर्षी विद्यापीठाचे वार्षिक अंदाजपत्रक हे ६०५ कोटी रुपयांचे आहे. गेल्या चौसष्ट वर्षांत विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा जवळपास ३५ पटींनी वाढला आहे. विद्यापीठाचा पहिला अर्थसंकल्प १९४९-५० या वर्षांसाठी मांडण्यात आला. त्यावेळी विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा १७ लाख रुपये होता. त्यानंतर विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षांत म्हणजे १९७३-७४ मध्ये विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा २११ लाखापर्यंत पोहोचला. १९९८ -९९ मध्ये विद्यापीठाचा अर्थसंकल्प ४१.३२ कोटी रुपये होता, तर गेल्यावर्षीचा म्हणजे २०१४-१५ चा अर्थसंकल्प हा ५५० कोटी रुपयांचा होता. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी साधारण ५० कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पात होते आहे.  
पुणे विद्यापीठाच्या उत्पन्नातील सर्वाधिक वाटा हा वेगवेगळ्या शुल्कांचा आहे. महाविद्यालयांचे संलग्नता शुल्क, विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क, मान्यता शुल्क मिळून उत्पन्नाच्या ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक भाग आहे. विद्यापीठाच्या ठेवी या ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहेत, त्याचे विद्यापीठाला मिळणारे फक्त व्याजही ६५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दरवर्षी वाढणाऱ्या अंदाजपत्रकात नक्की काय असते; तर गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा टप्पा ओलांडून विद्यापीठाकडून गुणवत्तावाढीसाठी तरतुदी केल्या जात असल्याचे निरीक्षण अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नोंदवतात. गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांसाठी गुणवत्ता सुधार योजना, संशोधन प्रकल्पांसाठी तरतुदी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तरतुदी केल्या जात आहेत. मात्र, त्या प्रत्यक्ष खर्च केला होत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्प फुगवला जात असल्याचा आक्षेपही घेण्यात येतो आहे.  दरवर्षी अर्थसंकल्प फुगवून तुटीचा मांडला जातो. पण प्रत्यक्षात वर्षांच्या ताळेबंद अधिक्याचा ठरतो. २०१३-१४ साली विद्यापीठाचा ताळेबंद हा जवळपास ५० कोटी रुपयांनी अधिक्याचा ठरला. मात्र, तरीही गेल्यावर्षी (२०१४-१५) १५९ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विद्यापीठाच्या अनेक योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी या खर्च होतच नसल्यामुळे अर्थसंकल्प तुटीचा असतो. मात्र, ताळेबंद अधिक्याचा दिसत आहे.

विद्यापीठे आणि अर्थसंकल्प
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील सर्वात श्रीमंत विद्यापीठ आहे. संलग्न महाविद्यालये आणि विद्यार्थी संख्याही सर्वाधिक आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ६०५ कोटी
मुंबई विद्यापीठ – साधारण ४५० कोटी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ – साधारण ३५० कोटी
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</span> – साधारण ३०० कोटी

‘‘विद्यापीठ अनेक तरतुदी करते. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्यात विद्यापीठ कमी पडताना दिसते आहे. योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठाची यंत्रणा पुरी पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केलेल्या तरतुदी या पडून राहतात. विद्यापीठाच्या पुंजीचा अधिकाधिक उपयोग विद्यार्थ्यांसाठी होणे गरजेचे आहे.’’
डॉ. गजानन एकबोटे, अधिसभा सदस्य