मतदान केंद्रांवर कोड स्कॅन करताना अडचणी

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा पेठ मतदारसंघातील सर्व मतदारांना ‘क्यूआर कोड’ असलेल्या मतदान चिठ्ठय़ांचे (वोटर स्लीप) वाटप करण्यात येणार होते. मात्र या चिठ्ठय़ा घरोघरी न वाटता प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर गेल्यानंतर सोमवारी या चिठ्ठय़ा मतदारांना देण्यात येत होत्या. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच या चिठ्ठय़ा असूनही मतदारांकडे ओळखीच्या पुराव्यांची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे निवडणूक शाखेचा क्यूआर कोड असलेल्या चिठ्ठय़ांच्या प्रयोगाला अल्पसेच यश मिळाले.

प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) क्यूआर कोड असलेल्या मतदान चिठ्ठय़ा वाटप करण्यात येणार होत्या. त्यासाठी पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयसीकडून क्यूआर कोड असलेल्या छापील चिठ्ठय़ा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, या चिठ्ठय़ा सदोष असल्याने नव्याने चिठ्ठय़ा पाठवण्याबाबत निवडणूक शाखेने मागणी केली होती. त्यानुसार मतदानाच्या आधी दोन दिवस सुमारे तीन लाख क्यूआर कोड असलेल्या चिठ्ठय़ा पुणे एनआयसीकडून कसब्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

परंतु, त्यांचे वाटप करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. दरम्यान, प्रशासनाकडून कसब्यात पारंपरिक मतदान चिठ्ठय़ांचे वाटप करण्यात आले होते. तसेच क्यूआर कोड असलेल्या मतदान चिठ्ठय़ा असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना ओळखपत्रांचे पुरावे मागण्यात आले.

‘दिल्लीच्या एनआयसीकडून शनिवारी नव्याने ऑनलाइन प्रक्रियेद्वारे छापील क्यूआर कोड असलेल्या चिठ्ठय़ा प्राप्त झाल्या. त्यानंतर चिठ्ठय़ांचे वाटप करण्याचे काम संबंधित निवडणूक प्रशासनाचे होते’, अशी माहिती पुणे एनआयसीचे वरिष्ठ अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

‘क्यूआर कोड’ चिठ्ठय़ांचे अनेक फायदे

कसब्यात दोन लाख ९० हजार ६८३ मतदार आहेत. क्यूआर कोड असलेल्या चिठ्ठय़ा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या चिठ्ठय़ांमुळे संबंधित मतदारांची सर्व माहिती समजणार असून, मतदारांना इतर पुरावे दाखवण्याची गरज नाही. त्यामुळे मतदान लवकर होईल तसेच मतदानाची टक्केवारी लगेच समजेल, असे सांगण्यात आले होते.

हा प्रयोग यंदा विधानसभा निवडणुकीत प्रथमच करण्यात आला. जिल्ह्य़ातील कोणत्याही एका विधानसभा मतदारसंघात ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कसबा पेठ मतदारसंघ निवडला होता.

मतदानासाठी येणाऱ्या मात्र ओळखपत्र नसणाऱ्या मतदारांसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरल्याचे दिसून आले. क्यूआर कोड स्कॅनमुळे ओळखपत्र नसतानाही मतदारांना मतदान करता आले. ही योजना बहुतांश मतदार संघात राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. – पुष्कर तुळजापूरकर, पदाधिकारी, भाजप कसबा मतदारसंघ