राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी पुण्यात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर थांबून स्वागत केले. तर सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या. या दोन्ही (अजित पवार आणि सुप्रिया सुळे) भावंडांचे अगत्य पाहून सर्वजण भारावून गेले होते.

आर. आर. पाटील अर्थात आबांची कन्या स्मिता पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आंनद थोरात यांच्या विवाह सोहळयाच्या ठिकाणी अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सकाळपासूनच हजर होते. त्यांनी या विवाह सोहळ्यात घरातील व्यक्तीप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत केले. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अजित पवार हे प्रवेशद्वारावर उपस्थित राहून प्रत्येक नागरिकांचे स्वागत करीत होते. त्याचदरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील हडपसर येथील विवाहाचे ठिकाण लक्ष्मी लॉनमध्ये प्रवेश केला आणि थेट स्मिता यांच्या आई सुमन यांच्याकडे गेल्या. यावेळी सुप्रिया यांना पाहून सुमन पाटील यांना अक्षरशः गहिवरून आले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करीत त्यांना अक्षता वाटल्या.

त्यानंतर स्मिता पाटील आणि आंनद थोरात यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास पालकमंत्री गिरीश बापट, प्रफुल पटेल, मंत्री राम शिंदे, सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, विश्वजीत कदम, निलम गोऱ्हे, खासदार उदयनराजे भोसले, सरकारी वकील उज्वल निकम यांसह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

मात्र, ज्यांनी हा विवाह जुळवून आणला ते राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार पायाच्या दुखण्याने त्रस्त असल्याने आणि डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिल्याने या विवाहला उपस्थित राहू शकले नाहीत.