News Flash

मुतण्याचे प्रयोग : अजित पवार नी राज ठाकरे, संदर्भ परस्परविरोधी पण उदाहरणात साम्य…

काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी 'आता धरणात मुतायचं का?', असे उद्गार काढून प्रतिष्ठित व्हाईट कॉलरांचा रोष ओढवून घेतला होता. आता पवारांच्या पंक्तीत राज ठाकरेही बसले आहेत.

Raj Thackeray Ajit Pawar

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राला दुष्काळानं प्रचंड ग्रासलं असताना, त्रस्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी ‘आता धरणात मुतायचं का?’, असे उद्गार काढून प्रतिष्ठित व्हाईट कॉलरांचा रोष ओढवून घेतला होता. चारचौघात प्रत्येकाच्या तोंडात येणारे शब्द अथवा वाक्यरचना सार्वजनिक व्यासपीठावर बोलत नाहीत, हा एवढा संकेत काय तो अजित पवारांनी पाळला नाही. आजही मुतणं ही खरंतर प्रत्येकजण रोज करत असलेली क्रिया उच्चारली गेली की सगळ्यांना आठवतात अजित पवारांचे ते उद्गार… आता पवारांच्या पंक्तीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही बसले आहेत.

नक्की वाचा >> “लॉकडाउन आवडे सरकारला”; महाराष्ट्रातल्या टाळेबंदीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे

पहिल्यांदा  पूराबद्दल बोलताना

झालं असं, पवार बोलले तेव्हा महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा संदर्भ होता, तर आज राज ठाकरे बोलले त्यामागे पूराचा संदर्भ आहे. आपली शहरं कशी नियोजनशून्य आहेत हे पोटतिडिकीनं सांगताना राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलून गेले की, “तीस चाळीस लोकं मुतली तरी पूर येईल असं आपल्या शहरांचं नियोजन आहे.” त्यांचा सगळा भर होता, हे सांगण्यावर की शहरांमध्ये मिळेल त्या जागांवर इमारती बांधून, सांडपाण्याचा निचरा करण्याची सोय न करून शहरं बकाल केली आहेत. जरा जरी जास्त पाऊस पडला तरी निचऱ्याअभावी पूरासारखी स्थिती होते, असं राज यांना अधोरेखित करायचं होतं. पण अजित पवारांप्रमाणेच अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये आपली मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरेंनीही हा मुद्दा मांडण्यासाठी आधार घेतला मुतणे या शब्दाचा.

नक्की वाचा >> “शहरे भकास होतं चाललीयत आपण मात्र रस्ते, पूल बांधण्यातच गुंतलोय”; राज ठाकरेंचा संताप 

दुसऱ्यांदा राजकीय  भाष्य करताना

केवळ शहर नियोजनच नाही तर एका राजकीय प्रश्नासंदर्भात बोलतानाही आज (२९ जुलै २०२१ रोजी) राज यांनी पुन्हा मुतणे या शब्दाचा वापर केला. राज यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना राज यांनी, “माझ्या भूमिका स्पष्ट असतात,” असं सांगितलं. मात्र पुढे बोलताना त्यांनी आपण वाटेल तसं, मनात येईल ते बोलत नाही असं सांगण्यासाठी, “बैल मुतल्या सारखा मी बोलत नाही,” हे वाक्य वापरलं. “मी चालता चालता काही बोलत नाही. चांगला निर्णय घेतला तर मी अभिनंदन केलं आहे आणि करत आलोय. माझा व्यक्तीला विरोध नसून धोरणाला विरोध आहे,” असं भाजपासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले.

सरकार कोणतंही असो पावसासंदर्भात सगळंच नियोजन ढिसाळ आहे. शहरे भकास होतं चाललीयत आपण मात्र रस्ते, पूल बांधण्यातच गुंतलोय. शहर नियोजन हे काही रॉकेट सायन्स नाहीय. इंच इंच लढू असं होतं, आता इंच इंच विकू असं सुरु झालं आहे, असं म्हणत त्यांनी शहर नियोजनाच्या आभावामुळे पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचं भाष्य केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 1:45 pm

Web Title: raj thackeray talk about flood issues but he use language similar to what ajit pawar had used for drought situation scsg 91
Next Stories
1 “शहरे भकास होतं चाललीयत आपण मात्र रस्ते, पूल बांधण्यातच गुंतलोय”; राज ठाकरेंचा संताप
2 राज ठाकरेंनी उलगडली ‘फडणवीस’ आडनावाची पर्शियन नाळ
3 “लॉकडाउन आवडे सरकारला”; महाराष्ट्रातल्या टाळेबंदीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे
Just Now!
X