दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

पुणे : नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या ‘फॅम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी निवेदनाद्वारे केली आहे. व्यापारी प्रशासनाने दिलेल्या कठोर निर्बंधाचे पालन करतील. मर्यादित वेळेत तसेच पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती शहा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत ‘फॅम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. राज्यातील व्यापाऱ्यांचा विरोध असल्याचे शहा यांनी नमूद केले आहे. गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. करोनाच्या संसर्गाबाबत माहिती नव्हती. त्या वेळी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदीत व्यापार बंद होता. टाळेबंदीची सर्वाधिक झळ व्यापारी, कामगारांना पोहोचली होती. त्या वेळी व्यापाऱ्यांनी सहकार्य केले होते. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. व्यापार हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान होईल, असे शहा यांनी नमूद केले.

सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांना उपचाराचे कौशल्य मिळाले आहे. या आपल्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत, याकडे शहा यांनी लक्ष वेधले.

पन्नास टक्के उपस्थितीत परवानगीची मागणी

सर्व दुकाने बंद करण्याऐवजी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व दुकाने, कार्यालये, उपाहारगृहे मर्यादित वेळेत खुली ठेवण्याची मुभा देण्याची मागणी राजेश शहा यांनी केली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.