नेत्रदीपक रोषणाई, आकर्षक मिरवणुका, ढोलताशे आणि डीजेचा दणदणाट, विविध कलापथकांचा समावेश, सिनेतारकांची हजेरी, गुलालाचा टाळलेला वापर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत सांगवीतील गणरायाला रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सांगवी परिसरातील मंडळे तसेच घरगुती गणपतींचे सातव्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, घरगुती गणपतींचे सकाळपासूनच विसर्जन करण्यात येत होते. दुपारपासून गणेश मंडळांनी विसर्जनाला सुरुवात केली. राहीमाही प्रतिष्ठान, रणझुंजार मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. चारच्या सुमारास विसर्जन मार्गावर रांगा लागू लागल्या. नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या ‘सिझन ग्रुप’ मंडळाच्या मिरवणुकीत अभिनेत्री श्रुती मराठे यांचे ढोल ताशा कलापथक तसेच ‘सैराट’ फेम हलगीचे पथक सहभागी होते. त्यांनी गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. शितोळेनगर क्रीडा मंडळाच्या मिरवणुकीत अभिनेत्री सिया पाटीलने हजेरी लावली. बहुतांश मंडळांच्या मिरवणुकांमध्ये ढोल ताशा पथकांचा समावेश होता, त्यात महिला वादकांचा समावेश मोठय़ा प्रमाणात होता. यंदाच्या वर्षीही गुलाल टाळण्याकडे मंडळांचा कल होता. विसर्जन मार्गावर राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, शितोळनगर क्रीडा मित्र मंडळ, भारतीय जनता पार्टी, ढोरेनगर मित्रमंडळ आणि शिवप्रतिष्ठान संघाच्या वतीने स्वागत कक्ष उभारले होते. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करताना दिसत होते. सांगवीतील तणावपूर्ण वातावरणामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी घेतली होती. चौकाचौकात तसेच विसर्जन घाटापर्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुका दहापूर्वी संपविण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून सूचना करण्यात येत होती. उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.