‘उद्योगांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. विशेषत: अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सूक्ष्म, लघु, मध्य उद्योगांच्या (एमएसएमई) पाठीशी उभे राहिले पाहिजे,’ असे स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी मांडले. देशातील उत्पादनाला उत्तेजन मिळण्यासाठी आणि प्रचारासाठी धोरणाची गरजही त्यांनी अधोरेखित के ली.

पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे  आयोजित ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग’ या परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात डॉ. जयशंकर बोलत होते. रेझिलियंट ग्लोबल ग्रोथ इन पोस्ट पँडेमिक वल्र्ड या विषयावर डॉ. जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री मरीस पेन यांच्याशी ज्येष्ठ उद्योगपती डॉ. नौशाद फोर्ब्स यांनी संवाद साधला. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय के ळकर या वेळी उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक गौतम बंबावाले यांनी सूत्रसंचालन के ले. जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मोटेगी तोशिमित्सू यांनी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे संदेश दिला.

गेल्या वर्षभरात करोनाचा प्रादुर्भाव, आर्थिक असमानता आणि सीमा प्रश्न ही तीन मोठी आव्हाने देशापुढे असल्याचे डॉ. जयशंकर म्हणाले. ‘आत्मनिर्भर भारत ही व्यापक संकल्पना आहे. मात्र सर्वच गोष्टी देशात निर्माण करणे शक्य नाही. त्यामुळे देशांमधील व्यापार समान पातळीवर असायला हवा. ऑस्ट्रेलिया, जपान या देशांसह भारत जागतिक अर्थव्यवस्था उभारत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाचे इंजिन झाला पााहिजे. करोना काळात भारताने अन्य देशांना लस पुरवण्याची मोठी जबाबदारी निभावली आहे. जवळपास ७० देशांना भारताकडून लस दिली जात आहे,’ असे जयशंकर यांनी सांगितले.

‘भविष्यात अशी आपत्ती निर्माण झाल्यास अर्थव्यवस्थेला धक्का न बसण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम मॅके निक्ससारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न आहे. करोनानंतरच्या काळात एकटय़ा देशाला वाटचाल करता येणार नाही. त्यासह परस्पर सहकार्य आवश्यक असेल. त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह सहकारी असणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियासाठी भारत विश्वासार्ह सहकारी आहे,’ असे पेन यांनी सांगितले.

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ब्रिक्स बँके चे माजी अध्यक्ष के. व्ही. कामत, जागतिक बँके च्या उपाध्यक्ष मॅन्युएला फेरो, एशियन डेव्हलपमेंट बँके चे उपाध्यक्ष शिक्झिन चेन, एशियन मॅन्युफॅ क्चर इन्व्हेस्टमेंट बँके चे उपाध्यक्ष डॅनी अ‍ॅलेक्झांडर यांनी ग्लोबल फायनान्स इन पोस्ट कोविड १९ वल्र्ड या विषयावर चर्चा केली.