राज्याच्या विधानसभा निवडणुकीला आता थोडासाच कालावधी शिल्लक राहिलेला असताना भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार पुढे येत आहे. मात्र, आजवर राज्यासाठी एकाच वेळी दोन मुख्यमंत्री आपण पाहिले नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा आणि शिवसेनेला टोला लगावला. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले.

पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकी अगोदरपासून आणि आता देखील भाजपाच्या विधानसभा निवडणुकीत २२० हून अधिक जागा येतील, असे विधान भाजपा नेत्यांकडून सतत केले जात आहे. आज भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटीलांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास त्यांना प्रत्येकी १०-१० जागा मिळतील असे विधान केले. त्यांच्या विधानातून सत्ताधारी पक्षाला सत्तेची किती मस्ती येते हेच स्पष्ट होत आहे.

शिवसेनेकडून पीक विमा कंपन्यांविरोधात काढलेल्या मोर्चावर भाष्य करताना पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभरापूर्वी शेतकर्‍यांना पीक विम्याचे काही पैसे देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत पुढील पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर आलेले नाहीत. आता हे सरकार पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर पैसे देईल आणि निवडणुकीत मतदान मिळविण्याचा प्रयत्न करेल. सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला आता लाज वाटायला लागली म्हणून त्यांनी विमा कंपन्यांविरोधात त्यांनी मोर्चे काढले.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याविषयी ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत यावे, अशा आशयाचे पत्र त्यांना पाठवले असून जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आघाडीत येतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, मागील साडेचार वर्षात सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. भ्रष्टाचाराचे आरोप होऊन देखील मुख्यमंत्र्याकडून अद्याप कोणत्याही प्रकरणाची चौकशी झालेली नाही किंवा विधीमंडळात याबाबत अहवाल ठेवण्यात आला नाही, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली.

आदित्य ठाकरेंचा सल्लागार नेमून प्रचार आणि दौरे सुरु

देशभरात अनेक राजकीय पक्षांकडून सल्लागार नेमून प्रचार आणि दौरे आयोजित केले जात आहेत. अशाच प्रकारे प्रशांत किशोर या सल्लागारामार्फत राज्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा दौरा सुरू आहे, अशा शब्दांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर निशाणा साधला.