News Flash

लोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा!

या समितीतील महिलांना शहरातील महिलांच्या स्वच्छतागृहांची पुसटशी तरी कल्पना आहे काय?

सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील घाणीचे साम्राज्य दूर करण्याच्या नावाने बोंब असणाऱ्या पुणे महानगरपालिकेत ती पाडून त्या ठिकाणी समाजमंदिरे बांधण्याचा प्रस्ताव येतो, हे केवढे निर्लज्जपणाचे आहे! त्याबद्दल कुणालाही कसलीही चाड नाही आणि आपण काही भयानक करतो आहोत, याचेही भान नाही. पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहे किती किळसवाणी आहेत, याबद्दल कोणताही पुणेकर जाहीरपणे आपले मत मांडेल. पण नगरसेवक आणि अधिकारी यांना मात्र ते कधीही दिसत नाही. सगळीकडे घाणीचे आणि दरुगधीचे साम्राज्य, पाण्याचा नळ धो धो सुटलेला, परिसरात सगळीकडे कचराकुंडीसारखी परिस्थिती हे सगळे किती लाजिरवाणे आहे, हे या सगळय़ा नगरसेवकांना कळत कसे नाही? पुणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीने शहरातील नऊ स्वच्छतागृहे पाडून त्या ठिकाणी समाजमंदिरे बांधण्याचा प्रस्ताव अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठवला आहे. या समितीतील महिलांना शहरातील महिलांच्या स्वच्छतागृहांची पुसटशी तरी कल्पना आहे काय?

‘लोकसत्ता’ने महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न सातत्याने मांडला आहे. पण नगरसेवक आणि अधिकारी निरक्षर असल्यासारखे त्याकडे डोळेझाक करीत आहेत. कारण या सगळय़ा व्यवहारात कुणाला कसलेच हितसंबंध राखता येत नाहीत. स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याने असे काय मोठे साधणार आहे? कोण बघतंय तिकडे? नागरिक शिव्या घालून घालून दमतील आणि गप्प बसतील, असा या सगळय़ांचा समज. निघालेत स्मार्ट पुणे करायला! शहरातील स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी आवश्यक असलेला निधी कुठे मुरतो, याचा शोध घेण्याची गरज कुणाला वाटत नाही, याचे कारण कुणाला हा प्रश्न गंभीर आहे आणि त्याचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध आहे, हेच कळत नाही. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर काही बदल होईल, असे वेडे स्वप्न उगीचच पुणेकरांना पडते आहे. सगळे किती मूर्ख आहेत!

पालिकेतील महिला बालकल्याण समितीला शहरातील स्वच्छतागृहेच कशी दिसतात आणि ती स्वच्छ करण्याचे सोडून तेथे समाजमंदिरे बांधण्याचेच कसे काय सुचते, हे एक गौडबंगालच आहे. या समितीच्या सगळय़ा सदस्यांना शहरातील फक्त महिलांच्या स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची ‘शिक्षा’ द्यायला हवी. मुळात ती पुरेशी नाहीत. जी आहेत, तेथे कुणीही महिला जाऊ धजणार नाही आणि समजा गेलीच, तर तिला ओकारी झाल्याशिवाय राहणार नाही. शहरात ज्या ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नागरिक जमतात, तेथे स्वच्छतागृहे असायला हवीत. पण शहरातल्या बागा पाहा. तुम्हाला तेथे एक क्षणही थांबता येणार नाही. शहरातील ज्या महिला कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात, त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहे असायला हवीत, हे समजायला काय डोके लागते काय? पण तेवढेही नसले, तर काय होते, हे पुण्यातील कोणत्याही महिलेला विचारले तर कळू शकेल. पालिकेत निर्णय घेऊ शकणाऱ्यांच्या घरातील महिला, त्यांना जाब कसा विचारत नाहीत? हे सगळे नगरसेवक डोळय़ांवर कातडे तर ओढतातच, पण त्यांच्या नाकालाही सुगंधी रुमाल लावलेले असतात की काय कोण जाणे!

प्रत्येक गोष्ट आंदोलन करून मिळवावी लागत असेल, तर या सगळय़ा नगरसेवकांचा उपयोग काय? त्यांना शहराचे प्रश्न तरी समजतात काय? समजत असतील, तर ते त्यासाठी काही करतात काय? असे काही घडत नाही, हे आजवर सिद्ध झाले आहे. महिलांच्या स्वच्छतागृहांबद्दल निम्म्या संख्येने असलेल्या नगरसेविकांनी एकत्र येऊन बेमुदत उपोषण का करू नये? हा प्रश्न राजकीय आहे काय? राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या नगरसेविकांना तो वेगवेगळा वाटतो काय? आपण सारे किती निर्लज्ज झालो आहोत, याचा याहून अधिक पुरावा कोणता असू शकतो? ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे’ अशा पाटय़ा महापौरांच्या नावाने शहरभर लावणाऱ्या पुण्यातील अस्वच्छता किती भयानक असते, याचा अनुभव प्रत्येकास येत असतो. शहराची स्वच्छताच तपासायची असेल, तर ती सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येच शोधायला हवी. एकाही नगरसेवकाला आणि नगरसेविकेला आजवर हा प्रश्न आपल्याशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या प्रभागाशी आणि एकूणच शहराशी संबंधित आहे, शिवाय तो अतिशयच महत्त्वाचा आहे, हे समजू नये, हेच तर सगळय़ा पुणेकरांचे केवळ दुर्दैव आहे.

mukund.sangoram@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 5:04 am

Web Title: toilets issue in pune pmc
Next Stories
1 समाजमंदिरांच्या उभारणीसाठी नऊ स्वच्छतागृहांवर हातोडा?
2 धोरणात्मक निर्णय होत नसल्याने पिंपरीतील वर्तुळाकार मार्गाचा संभ्रम कायम
3 शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज ९० व्या वर्षांत पदार्पण
Just Now!
X