शारीरिक अंतर राखण्यासाठी उपाय

पुणे : करोना संसर्गाच्या कालावधीमध्ये एकमेकांमध्ये शारीरिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने केरळमध्ये राबविण्यात आलेला छत्री पॅटर्न सध्या पुणे शहरात आंदोलनासाठी वापरण्यात येत आहे. रिक्षा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनात त्याची सुरुवात करण्यात आली.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना शासनाकडून वेळोवेळी केल्या जात आहेत. मात्र, खरेदीच्या ठिकाणी अनेकदा शारीरिक अंतर राखले जात नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी बाहेर पडताना हातात उघडलेली छत्री घेऊनच बाहेर पडण्याबाबत केरळमधील प्रशासनाने अधिकृत आदेशच काढले होते. दोन छत्र्या एकमेकांना चिकटल्या तरी त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर पाळले जाते. सध्या करोनाच्या काळात याच प्रयोगाचा वापर आंदोलनाच्या वेळी करण्यात येत आहे.

रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी रिक्षा पंचायतीकडून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठय़ा प्रमाणावर रिक्षा चालक सहभागी होणार असल्याचे लक्षात आल्याने एकमेकांत शारीरिक अंतर कसे राखणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला. करोना संसर्ग असतानाही मागण्यांसाठी दाद मागणे आवश्यक असल्याने या आंदोलनासाठी केरळच्या छत्री पॅटर्नचा वापर करण्याचा निर्णय रिक्षा पंचायतीने घेतला होता. त्यानुसार आंदोलनाला येताना प्रत्येकाने छत्री बरोबर आणली होती. एकत्रित निदर्शने करताना छत्री उघडण्यात आली. त्यामुळे आपोआपच एकमेकांत सुरक्षित शारीरिक अंतर ठेवले गेले. शहरात ही पद्धत प्रथमच वापरण्यात आल्याचे पंचायतीचे सरचिटणीस  नितीन पवार यांनी सांगितले. पंचायतीच्या आंदोलनानंतर आता इतर काही संघटनांनीही एकत्र येण्यासाठी या पॅटर्नचा वापर सुरू केला आहे.