करोना संसर्ग टाळण्यासाठी घरातून काम करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात येत असताना एमआयटी एडीटी विद्यापीठात घरातून काम करणाऱ्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली जात असल्याचे समोर आले आहे. प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीसाठी दोन श्रेणी करण्यात आल्या असून अनुक्रमे ३५ टक्के आणि ५० टक्के वेतन कपात करण्यात येत आहे.
करोना संसर्गामुळे यंदा राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापन केले जात आहे. महाविद्यालय-विद्यापीठातील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाने निर्णय प्रसिद्ध के ला आहे. त्यानुसार अंतिम परीक्षांचे काम करणाऱ्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना ऑनलाइन किं वा प्रत्यक्ष यापैकी शक्य त्या पद्धतीने काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असताना लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठ व्यवस्थापनाने ‘वर्क फ्रॉम होम पॉलिसी’ तयार केली असून त्यानुसार घरातून काम करणाऱ्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जाणार आहे. घरातून काम करणाऱ्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन, हृदयविकार आणि तत्सम आजार असलेल्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी त्याबाबतची कागदपत्रे दिल्यास त्यांना ६५ टक्के वेतन देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या या धोरणाबाबत प्राध्यापक-कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘घरातून काम के ल्यास वेतन कपात करण्याचा विद्यापीठ व्यवस्थापनाचा निर्णय अयोग्य आहे. राज्य शासनानेही घरातून काम करण्यास मुभा दिलेली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यापीठात जाण्याची एका अर्थाने सक्तीच आहे. तसेच कपात केलेले वेतन पुन्हा मिळणार की नाही या बाबत काहीच स्पष्टता नाही,’ असे काही प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी सांगितले.
करोना संसर्गामुळे विद्यापीठातील प्राध्यापक आणि इतर कर्मचारी गेले पाच ते सहा महिने घरातूनच काम करत आहेत. मात्र जेईई, सीईटी आणि पेरा अशा परीक्षांनंतर आता अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पालक, विद्यार्थी विद्यापीठात येत असल्याने त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा आणि बॅकलॉग परीक्षांचेही नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मध्यवर्ती परीक्षा सुरू असल्याने परीक्षेची तयारी करणे, देखरेख करणे, पेपर तपासणी करून निकाल जाहीर करण्यासाठी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना विद्यापीठात येणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून सांगण्यात आल्यानुसार सुरक्षित अंतर, मुखपट्टीचा वापर, वारंवार हात धुणे आदी उपाययोजना के ल्या जात आहेत. करोना महामारीमुळे स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठात येणे शक्य नाही, त्यांना व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होम धोरणाबाबत कळवले आहे.
– महेश चोपडे, कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ