देशभरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशीच परिसरात पुणे शहरात देखील असून आज दिवसभरात सर्वाधिक २९१ रुग्ण आढळून आले आहेत. तर आजच १४ जणांचे प्राणही या करोना विषाणूने घेतले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

देशभरात करोना विषाणूचे आजपर्यंत एक लाख १८ हजाराच्या पुढे रुग्ण संख्या गेली आहे. तर तीन हजार ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशीच परिस्थिती पुणे शहरात देखील असून आज दिवसभरात २९१ रुग्ण आढळले आहे. आजपर्यंतची एकाच दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या ४ हजार ३९८ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आज अखेर शहरातील करोनाबाधितांच्या मृतांचा आकडा २४१वर पोहोचला आहे.

तसेच उपचार घेत असलेल्या १८९ रुग्णांची पुन्हा करोनाची चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेरपर्यंत २ हजार ३७१ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे आरोग्य मार्फत सांगण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात २१ करोनाबाधित आढळले

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात एकूण २१ जण करोना पॉझिटिव्ह आढळले. तर २० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शहरातील करोनामुक्त व्यक्तींची संख्या १६१ वर गेली आहे. तर शहरातील करोनाबाधितांची संख्या २७४ वर पोहचली आहे. आज आढळलेले करोनाबाधित हे चिखली, भोसरी, आनंद नगर (चिंचवड), राहाटणी, काळेवाडी, दापोडी, येरवडा, कुदळवाडी (चिखली), बिजलीनगर या परिसरातील आहेत.