मुंबईला कुरियर कंपनीची अठरा लाखांची रोकड घेऊन जाताना पुणे-मुंबई प्रवासात बसमध्येच ती बॅग चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो तळेगाव दाभाडे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
जतीन सुनिलभाई दर्जी (वय १९, रा. अहमदनगर, मूळ- गुजरात) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील एका कुरियर कंपनीत दर्जी यांचे वडील कामाला आहेत. ते नगर येथील लहान व्यापाऱ्यांकडून पैसे जमा करून एकत्रित झालेली रक्कम पुणे आणि मुंबई येथे पाठविण्याचे काम करतात. सुनीलभाई हे कंपनीच्या कामाच्या निमित्ताने जळगाव येथे गेले होते. त्यामुळे व्यापाऱ्याकडून जमा झालेली रक्कम जतीन याला मुंबई येथील कंपनीत घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यानुसार जतीन हा १८ जून रोजी अहमदनगर येथून खासगी बसने मुंबईला जाण्यासाठी निघाला. त्याने अठरा लाखांची रक्कम ही एका काळ्या रंगाच्या सॅकमध्ये ठेवली होती. ही सॅक बसमध्ये डोक्याखाली घेऊन झोपी गेला. १९ जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर आल्यानंतर त्याच्या जवळील पैशाची बॅग चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने या प्रकरणी येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या ठिकाणी शून्य क्रमांकाने दाखल करून तपासासाठी तळेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2014 रोजी प्रकाशित
अहमदनगर-मुंबई प्रवासात अठरा लाखांची रोकड चोरली
मुंबईला कुरियर कंपनीची अठरा लाखांची रोकड घेऊन जाताना पुणे-मुंबई प्रवासात बसमध्येच ती बॅग चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
First published on: 25-06-2014 at 02:53 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 lacks looted in ahmednagar mumbai journey