पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, गेल्या २४ तासांत ६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबईत सर्वाधिक २० रुग्ण असून, त्याखालोखाल पुण्यात १७ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनामुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ५९ रुग्ण आढळले. त्यात मुंबई २०, पुणे महापालिका २५ व पुणे ग्रामीण १, पिंपरी-चिंचवड महापालिका, कोल्हापूर महापालिका आणि सातारा प्रत्येकी २, सांगली महापालिका १ आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका ७ व जिल्हा १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते २ जूनपर्यंत १२ हजार ११ संशयित करोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८७३ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या ४९४ असून, ३६९ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनाच्या १० रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील ९ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. त्यातील एका रुग्णास मूत्रपिंडविकारासह चेताविकार होता, तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्याला अपस्माराचा आजार होता. चौथ्या रुग्णास गंभीर स्वरूपाचा मधुमेहाचा आजार होता. पाचव्या रुग्णास फुफ्फुसाचा आजार होता. सहाव्या रुग्णास मधुमेहासह अर्धांगवायू झाला होता. सातव्या रुग्णास गंभीर स्वरूपाचा श्वसनविकार होता तर आठव्या रुग्णास ताप आणि धाप लागणे अशी लक्षणे होती. गेल्या २४ तासांत राज्यात आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला असून, दोन्ही रुग्णांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील करोना संसर्ग (१ जानेवारी ते २ जून)

करोना चाचण्या – १२ हजार ११

एकूण रुग्ण – ८७३

मुंबईतील रुग्ण – ४८३

पुण्यातील रुग्ण – १२१

सक्रिय रुग्ण – ४९४

बरे झालेले रुग्ण – ३६९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्ण मृत्यू – १०