पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मासूळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात नवीन नेत्र शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता दररोज ३५ शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या नवीन शस्त्रक्रिया कक्षात उच्च दर्जाचे मायक्रोस्कोप आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बसविण्यात आली आहे. हे साहित्य एका कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) उपलब्ध करून दिले आहे.
अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार म्हणाले, ‘महापालिकेच्या वतीने चालवले जाणारे एक स्वतंत्र नेत्रोपचार केंद्र आहे. परिसरातील रहिवासी, ग्रामीण भागातील नागरिक आणि एमआयडीसी परिसरातील कामगारवर्गासाठी ही सेवा महत्त्वाची आहे. याआधी मर्यादित साधनसंपत्तीमुळे रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती.’
‘येथे सरासरी २५ शस्त्रक्रियांची क्षमता होती. आता नव्या अत्याधुनिक उपकरणांमुळे एका दिवसाला ३५ शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. तर, वर्षभरात सुमारे चार हजार ५०० हून अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल. या विस्तारामुळे रुग्णांवरील आर्थिक भारदेखील कमी होणार असून, प्रतीक्षेमुळे होणारे नुकसान टळेल आणि वेळेवर नेत्रोपचार उपलब्ध होणार आहेत. यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे,’ असे दादेवार यांनी सांगितले.