– सागर कासार

पुण्यातील मुंढवा-केशवनगर भागात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेत भोई वस्ती येथे राहणार्‍या सुमित्रा सूर्यकांत तारू या ७० वर्षांच्या आजींना बिबट्याने जखमी केले आहे. मात्र, जर त्यांनी समोर असणाऱ्या बिबट्याच्या तोंडावर बादली फेकून मारली नसली तर हा हल्ला त्यांच्या जीवावर बेतू शकला असता.

या घटनेमुळे केशवनगर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, बिबट्याने परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला यात या आजीबाईंसह आणखी दोघेजण जखमी झाले आहेत.

दरम्यान, सुमित्रा तारू या आजींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हा थरारक अनुभव लोकसत्ताच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर घराबाहेरील चुलीवर पाणी ठेवण्यासाठी बाहेर गेले होते. चुलीच्या बाजूला एक रिकामी बादली होती. तेथून काही फुट अंतरावर मला भटकं कुत्रं असल्याचा भास झाला. मात्र, तो बिबट्या असल्याचे मला दिसले. त्यानंतर मी बचावासाठी त्यांच्या तोंडावर जवळची बादली फेकून मारली. या अचानक हल्ल्यामुळे गोंधळलेल्या बिबट्याने माझ्यावर झडप घातली आणि मानेला तसेच डोक्याला इजा केली.

या जीवघेण्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी मी हातातील बादली त्याच्या डोक्यात घातली आणि बाहेरच्या बाजूला पळत सुटले. त्यानंतर आरडा ओरड करण्यास सुरुवात केली आणि वाघ आल्याचे सर्वांना सांगितले. तेवढ्यात भिंतीवरून उडी मारून बिबट्या पसर झाला. घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या घुसल्याचे या आजीबाईंनी सांगितले. तसेच आपण या भागात ४० वर्षांपासून राहत आहोत. इतक्या वर्षात इथं कधीही कोणताही वन्यप्राणी आला नाही. मात्र आज बिबट्या कसा आला याचे आश्चर्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.