लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: दुबईहून आलेल्या भेटवस्तुंच्या खोक्यात अमली पदार्थ सापडल्याची धमकी देऊन एका महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल ९१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका ३१ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे पती व्यावसायिक होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्याने महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने महिलेकडे केली. तुम्हाला दुबईहून भेटवस्तुंचे खोके पाठविण्यात आले आहे. खोक्यात ९०० ग्रॅम अमली पदार्थ सापडले असून पोलिस कारवाई करणार आहेत. मुंबईतील सायबर गुन्हे शाखेचे अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्याशी तातडीने संपर्क साधा, अशी बतावणी सायबर चोरट्याने महिलेकडे केली. त्यानंतर महिलेने अजयकुमार बन्सल नाव सांगणाऱ्या चोरट्याचा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून तुमचे बँक खाते गोठविण्यात येणार आहे, असे बन्सल नाव सांगणाऱ्या चोरट्याने महिलेकडे केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक खाते गोठविण्यात येणार असल्याने तातडीने दुसऱ्या खात्यात पैसे जमा करा. चौकशी पूर्ण झाल्यानतंर पैसे मिळतील, अशी बतावणी करुन चोरट्याने महिलेला तीन बँक खात्यांचे क्रमांक पाठविले. महिलेने घाबरून २० लाख रुपये जमा केले. त्यानंतर महिलेने मुदतठेवी मोडून चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात सुमार ८० लाख रुपये जमा केले. महिलेने बन्सल नाव सांगणाऱ्या चोरट्याचा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.