पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने गटशेती प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात राज्यात पाणी फौउंडेशनच्या माध्यमातून गटशेतीचा प्रयोग राबविला जाईल, अशी घोषणा पाणी फौउंडेशनचे संस्थापक, अभिनेते आमिर खान यांनी येथे गुरुवारी केली. गटशेतीच्या प्रयोगातून शेकडो शेतकऱ्यांना उद्योजक घडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
पाणी फौउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे, पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि रीना दत्ता, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती
आमिर खान म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी पाणी फौउंडेशनन जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रावर काम सुरू केले. पाणलोट मध्ये यशस्वी काम करत राज्यातील गावांनी अशक्य काही नाही, हे दाखवून दिले. करोना संकट काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पाणी फौउंडेशनने गटशेतीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पुढील दोन वर्षात संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबविण्याचा मानस आहे.
गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणे हे केवळ एकीच्या माध्यमातून शक्य आहे. शेतकरी केवळ आपला नव्हे तर देशाचा प्रश्न सोडवत आहेत. देशातील विविध आंदोलने ही शेतीच्या प्रश्नांमुळे होत आहेत. मात्र जे सरकार करू शकत नाही ते शेतकरी करू शकतो, हे दाखवून दिले आहे, असे विलास शिंदे यांनी सांगतिले.
हेही वाचा >>>बायोगॅस प्रकल्पामधून आता शुद्ध पाणी; शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांचे संशोधन
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमधील ३००० गटांनी या स्पर्धेत भाग घेतला. यातील २१ गटांची अंतिम फेरीची निवड करण्यात आले. त्यातून करमाळा तालुक्यातील कुंभारगाव ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना १५ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कर देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर मधील घोडेगाव येथील आई जिजाई महिला शेतकरी गट आणि वारंगा तर्फ नांदापुर (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील उन्नती शेतकरी गट यांना दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात आला. आटपाटी तालुक्यातील शेरेवाडी प्रगती महिला शेतकरी गट आणि कमराळा तालुक्यातील सौंदे रॉयल फार्मर शेती गट यांना तिसरा पुरस्कार विभागून देण्यात आला.