मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांनाच मिळणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली. दुसरीकडे, शिवसेनेतील घडामोडींनी वेग घेतला असून विद्यमान खासदार गजानन बाबर व सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांच्यात उमेदवारीसाठी निर्णायक टप्प्यावर अटीतटीची स्पर्धा सुरू आहे. मुंबईत ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्हीकडील कल त्यांनी आजमावून घेतल्यानंतर, मी देईन त्या उमेदवाराला निवडून आणा, असे फर्मान उद्धव यांनी सोडले. मात्र, उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यात ठेवला.
मावळ लोकसभेची जागा कायम राखण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना केली आहे. उद्धव यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मावळ लोकसभेतील पदाधिकाऱ्यांचा कानोसा घेण्यात आला. त्या वेळी बारणे व बाबर यांची बलस्थाने तशीच कमकुवत बाजूची माहिती ठाकरे यांनी घेतली. घाटावरचे व िपपरी-चिंचवडचे अशा दोन्ही भागातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राष्ट्रवादीचे जगताप हे उमेदवार असतील तर कोणता उमेदवार टक्कर देऊ शकेल, या महत्त्वपूर्ण मुद्दय़ासह स्थानिकला स्थानिक उमेदवार द्यावा का, याचा विचार झाला. मात्र, स्थानिकचा मुद्दा फक्त िपपरी-चिंचवडपुरता राहील. उर्वरित भागासाठी कोकण पट्टय़ातील उमेदवार स्थानिक असतील, असे स्पष्ट करण्यात आले. चिंचवड विधानसभा व मावळ लोकसभा या दोन्हीही निवडणुकीत जगतापांच्या प्रभावक्षेत्रात शिवसेनेचे बूथ नव्हते, पोलिंग एजंटही नव्हते, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. अखेर, चर्चेच्या शेवटी, मी देईन त्या उमेदवाराचे काम करण्याचे व त्यास निवडून आणण्याचे आवाहन ठाकरे यांनी सर्वाना केले. तथापि, उमेदवाराच्या नावाची थेट घोषणा केली नाही.
शिरूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी राम गावडे
शिरूर लोकसभा जिल्हाप्रमुखपदावरून उमेश चांदगुडे यांची उचलबांगडी करण्यात आली असून खासदार शिवाजीराव आढळराव यांचे समर्थक राम गावडे यांची वर्णी लावण्यात आली आहे. चांदगुडे यांना पद मिळवून देण्यासाठी एकेकाळी आढळरावांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. तथापि, त्याच आढळरावांच्या नाराजीमुळे चांदगुडे यांना पद सोडावे लागल्याचे मानले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
मी देईन त्या उमेदवाराला निवडून आणा- उद्धव ठाकरे
मुंबईत ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्हीकडील कल त्यांनी आजमावून घेतल्यानंतर, मी देईन त्या उमेदवाराला निवडून आणा, असे फर्मान उद्धव यांनी सोडले.
First published on: 19-02-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accept the candidate which i will give uddhav thackeray