पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याने झालेल्या वादावादीत टोळक्याने काकाला दगडाने बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी साहेबराव भीमराव ओरसे (वय ५२, रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहन जाधव, प्रतीक अलकुंटे आणि दोन साथीदार (सर्व रा. जनवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जनवाडीतील पीएमसी कॉलनीमध्ये सोमवारी रात्री पावणेबारा वाजता घडली.
हे ही वाचा…पिंपरी-चिंचवड: फिनिक्स मॉलच्या समोर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; ‘या’ कारणांमुळे केला गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी कॉलनीत गणपती मिरवणुकीत सर्व जण नाचत होते. यावेळी फिर्यादी यांचा पुतण्या यश ओरसे याचा धक्का लागला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा मोहन जाधव आणि इतरांनी फिर्यादी सोबतचे सर्वांना शिवीगाळ केली. हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहन जाधव याने त्या ठिकाणी पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या तोंडावर, डोळ्याजवळ मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक कराडे तपास करीत आहेत.