इंदापूर – पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांत आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना पक्षात घेऊन सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मिळालेला आधार, इंदापूरचे सोनाई उद्योग समूहाचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांना दिलेला पक्षप्रवेश, दौंडचे आमदार राहुल कुल यांचे भाजपाशी असलेले थेट संबंध, तसेच तेथील वासुदेव काळे यांसारख्या कार्यकर्त्यांची ताकद या सगळ्यामुळे भाजपाने जिल्ह्यात आपली स्थिती भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

बारामतीच्या राजकीय मैदानातदेखील भाजपाचे प्रयत्न वाढले आहेत. याशिवाय अलीकडेच पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनाही भाजपात प्रवेश देण्यात आला असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या या प्रवेशाचा जिल्ह्यात पक्षाला कसा फायदा होईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यात भाजप, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या आघाडीचे सरकार असले तरी पुणे जिल्ह्यात भाजपाने केलेल्या हालचाली या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला थेट आव्हान ठरत आहेत. ज्या जिल्ह्यातून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, त्याच जिल्ह्यात त्यांच्या प्रभावाला धक्का देण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे विशेष लक्ष लागले आहे. पक्षातील फुटीनंतरही अजित पवार गटाशी निष्ठा राखणाऱ्या गारटकरांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याआधी इंदापूर नगराध्यक्ष म्हणून काम केलेले, तीन वेळा विधानसभा निवडणुकीत उतरलेले आणि कार्यकर्त्यांशी दांडगी नाळ जुळवलेले गारटकर हे पुणे जिल्ह्यात ओळखलेले नेतृत्व आहे.

गारटकरांनी अलीकडच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून संघटन बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील महिन्यात प्रदीप गारटकर मित्र परिवाराने इंदापूर येथे दहीहंडीचे मोठे आयोजन करून तरुणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इंदापूरमध्येच ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुस्लिम बांधवांशी संवाद साधत फराळ वाटपाचा उपक्रम हाती घेतला. या हालचालींकडे पक्ष संघटन मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, कृषी खात्याचा पदभार स्वीकारलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या राजकीय ताकदीचा आधार घेऊन गारटकर भाजपाच्या हालचालींना रोखून धरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी इंदापूर केंद्रस्थानी ठेवून केलेली संघटनात्मक चळवळ आणि भरणे यांची राजकीय ताकद वाढल्याने गारटकरांच्या राजकीय रणनितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सगळ्या हालचालींतून भाजपाने पुणे जिल्ह्यात विविध नेते व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपले अस्तित्व ठळक करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदीप गारटकर यांनी इंदापूरच्या मातीतूनच आपली रणनिती उभी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे राजकारण भाजपाच्या आक्रमक हालचाली आणि गारटकरांच्या संघटनात्मक प्रयत्नांभोवती फिरताना दिसत आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण असल्याने अनेक पक्षांची व नेत्यांची अध्यक्षपदासाठी महत्त्वाकांक्षा पणाला लागली असल्याचे चित्र आत्ताच दिसत आहे.