बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या आदेशानुसार बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट, तसेच तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर आणि प्रीतम पहाडे या चौघांनी राजीनामे दिले आहेत.

बँकेतल्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, संचालक मंडळाच्या नवीन पुनर्रचनेसाठीच हे राजीनामे घेतलेले असावेत असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला  जात आहे. अध्यक्षपदी सचिन सातव हे पुन्हा कायम राहतील का आणि उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल का, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे.  

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बारामती सहकारी बँकेने भरीव कामगिरी करत बँकेची अनुत्पादित कर्जे लक्षणीय कमी केली आहेत. बँकेला यंदा चांगला नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या महत्त्वाच्या चार संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बँकेच्या उपाध्यक्षपदी महिला संचालकाला यंदा स्थान मिळणार का याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती सहकारी बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी अध्यक्ष सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अथक परिश्रम केले आहेत. बारामती बँकेने यंदा सात कोटी ९० लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेने ३१ मार्चअखेर ३६३२ कोटींचा व्यवसाय करत ५३.२९ कोटींचा ढोबळ नफा मिळवला आहे. आजवरच्या ढोबळ नफ्यात हा विक्रमी आहे.