scorecardresearch

“लगेच गुडघ्याला बाशिंग बांधायचं..”, अजित पवारांच्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही कानपिचक्या! ‘त्या’ प्रकाराचा केला उल्लेख!

अजित पवार म्हणतात, “कालपर्यंत त्यांच्या अस्थींचंही विसर्जन झालेलं नव्हतं. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या!”

ajit pawar
अजित पवारांच्या विरोधकांना कानपिचक्या! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ajit Pawar on Kasba Bypoll: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीच्या मेसेजमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच पुण्यातील काही बॅनर्समुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या कसब्यातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्या ठिकाणी लागलीच कुणाला संधी मिळणार, कोण खासदार होणार यावर दावे-प्रतिदावे सुरू झाल्यामुळे त्यावरून अजित पवारांनी सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोघांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.

नेमका काय आहे प्रकार?

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत कुणाला संधी मिळणार? कोण खासदार होणार? याची लगेच चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआ पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक लढवणार, असं जाहीर केलं. त्यापाठोपाठ पुण्यात भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर झळकले. शिवाय, भाजपाकडून गिरीश बापट यांच्याच कुटुंबात उमेदवारी दिली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात शुक्रवारी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज दोन्ही बाजूच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Pune banner jagdish mulik
पुण्यात जगदीश मुळीक यांच्यानावे लागलेले बॅनर!

“सगळ्यांनीच तारतम्य पाळायला हवं”

“मी कालही याबाबत त्यांचे चिरंजीव, सूनबाई, कन्येला भेटायला गेलो तेव्हा त्यावर बोललो. कालपर्यंत त्यांच्या अस्थींचंही विसर्जन झालेलं नव्हतं. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या. एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही. याबाबत साधारण आपल्याकडे पद्धत आहे की १३-१४ दिवस आपण दुखवटा पाळतो. सगळ्यांनीच त्याचं तारतम्य पाळलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांनीही ते ठेवलं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही ते ठेवावं अशी अपेक्षा आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी दोन्हीकडच्या नेत्यांना सुनावलं.

“आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले, “काही माणुसकी…”

वडेट्टीवारांच्या विधानाचा समाचार

दरम्यान, शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. “लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाले आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील”, असं अजित पवार म्हणाले होते.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:40 IST

संबंधित बातम्या