पुणे : अखिल भारतीय रेल्वे चालक संघटनेकडून (ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन- एआयएलआरएसए) दोन दिवसांचे आंदोलन पुकारण्यात आले असून, चालक आणि गाडीवरील व्यवस्थापकांकडून (गार्ड) उपाशीपोटी गाड्या चालवत असल्याचा दावा रेल्वेचालकांनी केला आहे. मात्र, रेल्वेचालकांनी जेवूनच रेल्वे चालविल्याचा दावा मध्य रेल्वे विभागाच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी केला.

केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार रेल्वेतील कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२४ पासून २५ टक्के (किलोमीटर दर) वाढीव भाडेवाढ देण्याचे मंजूर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप महागाई भत्ता किंवा भाडेवाढ लागू करण्यात आलेली नाही. तसेच चालकांना देण्यात येणाऱ्या भत्त्यामधून प्राप्तिकरातून ७० टक्के सूट मंजूर केलेली नाही, कामाचे तासही निश्चित करण्यात आले नाहीत, अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

‘एआयएलआरएस’ संघटनेकडून वारंवार मागणी करण्यात आली असून, यावर अद्याप निर्णय़ घेण्यात आलेला नाही. याचा निषेध म्हणून अखिल भारतीय रेल्वे चालक संघटनेतील चालक आणि गाडी व्यवस्थापकांनी उपाशीपाेटी गाड्या चालविल्या आहेत, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली.

मागण्यांसाठी आंदोलन करतानाच रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत राहण्यासाठी रेल्वेचालकांनी उपाशीपोटी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागात पुणे, नगर, दौंड, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, रेल्वेचालक, व्यवस्थापक यांच्या आंदोलनाबाबत माहिती मिळाली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयीन स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पुणे विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे, असे पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पी. यू. जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वेचालकांनी व्यवस्थित जेवूनच रेल्वे चालवली असल्याचा दावाही त्यांनी केला.

रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसदर्भात रेल्वे विभागीय व्यवस्थापक, तसेच मंत्रालयीन स्तरावर अनेकदा मागणी करण्यात आली आहे. मात्र, कुठलाच निर्णय होत नसल्याने संपूर्ण भारतात धावणाऱ्या रेल्वेगाड्या उपाशीपोटी चालवल्या आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनालाही कल्पना देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनीष मिश्रा, विभागीय अध्यक्ष, एआयएलआरएसए