लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील शासकीय वसतिगृहांचा सुरक्षा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती वसतिगृहांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये अमरावतीच्या विभागीय सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर, एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. सोनाली रोडे, मुंबईचे विभागीय सहसंचालक डॉ. केशव तुपे यांचा समावेश आहे. ही समिती उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांचा आढावा संबंधित प्राचार्य, वसतिगृह प्रमुख, वसतिगृह अधीक्षक, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत घेईल. त्यानंतर तातडीने करण्याच्या उपाययोजना निश्चित केल्या जातील.

हेही वाचा… कारागृहात कैद्यांकडून होणारा मोबाइलचा वापर होणार कायमचा बंद, कारागृह प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपाययोजना करण्यासाठी संबंधित प्राचार्य, अधीक्षक यांच्यामार्फत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल. उपाययोजनांपैकी ज्या बाबींना शासन मान्यतेची आवश्यकता आहे, त्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करणे, भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी उपाययोजना सुचवणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.