पुणे : मराठी रंगभूमीवरचा तेजस्वी तारा, दिग्गज अभिनेता आणि संवेदनशील, भावस्पर्शी अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अरुण सरनाईक यांच्या ‘पप्पा सांगा कुणाचे…?’ या गाण्यातील प्रश्नार्थक ओळीचे उत्तर, ‘पप्पा साऱ्या रसिकांचे’ अशी रीतीने पूर्ण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

निमित्त होते सरनाईक यांच्यावरील ‘पप्पा सांगा कुणाचे?’ या लघुपट प्रदर्शन सोहळ्याचे. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे, नाना पाटेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक रणजित नाईकनवरे, लघुपट निर्मात्या आणि सरनाईक यांची कन्या सविता सरनाईक-नाईकनवरे या वेळी उपस्थित होते. अरुण सरनाईक यांचे चित्रपट, आठवणी आणि प्रसंगांची माहिती असलेल्या संकेतस्थळाचेही या वेळी उद्घाटन करण्यात आले.

‘मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सरनाईक यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. ‘सिंहासन’ या चित्रपटात त्यांनी ‘मुख्यमंत्री’ या पात्राची भूमिका वठविली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या दालनात गेलो असताना, त्यांनी उठून सरनाईक यांना ‘मुख्यमंत्री या’ अशी दाद दिली होती,’ अशी आठवण पटेल यांनी सांगितली.

नाना पाटेकर यांनी, ‘एक पाखरू आमच्यावर रुसलंय’ या सरनाईक यांच्याच चित्रपटातील गाजलेल्या वाक्याचा आधार घेऊन त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. पाटेकर म्हणाले, ‘मला सर्वांत पहिल्यांदा चित्रपटात स्थान दिले अरुण सरनाईक यांनी. एखाद्या पात्राची भूमिका वठवताना सहजता आणि तरलता यांचा समन्वय ते साधत. त्यामुळे रसिकांकडून त्यांना दाद मिळाली. सध्याचे नट मात्र ‘मी किती सहज काम करतो’ अशा आवेशात असतात. ते भूमिकेच्या गाभ्यापर्यंत गेलेले नसतात.’

सरनाईक यांच्या तुघलक, सिंहासन, अमृतवेल आदी कलाकृतींतील अभिनयाची पाटेकर यांनी आठवण करून दिली. ‘‘सिंहासन’च्या चित्रीकरणावेळी माझा अरुणशी परिचय झाला. इतकी वर्षे मनात जे दाटलेले होते, ते सविता सरनाईक यांनी लघुपटाच्या माध्यमातून मोकळे केले आणि ते आवश्यकही होते,’ असे डाॅ. आगाशे यांनी सांगितले. सरनाईक यांची कन्या सविता नाईकनवरे यांनी ‘पप्पा सांगा कुणाचे, पप्पा साऱ्या रसिकांचे,’ असे गौरवोद्गार काढताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘म्हणून ते ‘लब्बाड पटेल’!’

‘‘सिंहासन’ चित्रपटात एकूण ३६ अभिनेत्यांनी काम केले. त्यात सरनाईक यांच्यासमवेत मीदेखील काम केले. मात्र, त्यानंतर आजतागायत जब्बार पटेल यांनी मला त्यांच्या सिनेमात घेतले नाही, इतका त्यांचा माझ्या बाबतीत दांडगा अनुभव आहे. त्यांनी चित्रपटाच्या मानधनापोटी पाच हजारांपैकी तीनच हजार रुपये दिले. दोन हजार अजूनही दिले नाहीत. पटेल केवळ गोड बोलतात, म्हणून त्यांना मी ‘लब्बाड पटेल’ म्हणतो,’ अशी कोपरखळी नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात मारली.