पुणे : वाघोली येथील दहा एकर जमीन प्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह १६ जणांवर वाघोली पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अपर्णा यशपाल वर्मा (वय ५८, रा. अंधेरी, मुंबई) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लांडगे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध चंदनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी फिर्यादी अपर्णा वर्मा यांच्या नावे दुसरी महिला उभी करून त्यांची जमीन बळकाविण्याचा कट रचला. त्यांच्या नावाने बनावट दस्त तयार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल आहे. लांडगे यांनी बनावट खरेदीखत करून ते खरे असल्याचे भासवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळकत साठेखतासह दुय्यम निबंधकांकडे नोंदणीकृत करून जमीन बळाकाविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात नोएल जोसेफ दास, ज्योती नोएल दास, राहुल नोएल दास, रोशनी नोएल दास, जॅक्सन नोएल दास, रोहित जॅक्सन दास, गिरीश रामचंद्र कामठे, हेमंत कामठे, संतोष शेट्टी, अदित्य घावरे, अमोल भूमकर, राजेंद्र लांडगे, रामेश्वर बळीराम मस्के, सहदुय्यम निबंधक कार्यालयील एक जण, तसेच सहदुय्यम निबंधक येथील दस्त नोंदणी करणारे निबंधक यांच्यासह १६ जणांचा समावेश आहे. २०२४ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत ही घटना घडली.
वाघोली येथील एकाच जमिनीवर अपर्णा वर्मा नावाच्या चार महिलांनी दावा केला. वेगवेगळ्या लोकांशी संगनमत करून चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी खरेदीखत करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लांडगे आणि इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वाघोली येथील १० एकर जागेच्या मालकीवरून अपर्णा वर्मा नावाच्या चार महिला समोर आल्या होत्या. त्यांनी आपणच जमिनीच्या खऱ्या मालक असल्याचा दावा केला होता. मुंबई येथील अपर्णा वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून राजेंद्र लांडगे आणि साथीदारांनी साडेसहा कोटी रुपये खंडणी वसूल केली होती.
दरम्यान, नोएल जोसेफ दास आणि साथीदारांनी ही जमीन १९९१ मध्ये खरेदी केली असून, तिच्यावर आपली मालकी आहे. आपण परदेशात असल्यामुळे सातबारा उताऱ्यावर नाव लावू शकलो नव्हतो. आता पुण्यात परतले आहोत, असा दावा करून त्यांनी जागेचे बनावट खरेदीखत करून ते खरे असल्याचे भासविले. ही मिळकत साठेखतासह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करून अपर्णा वर्मा यांची जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक डांगे अधिक तपास करीत आहेत.
प्रकरण नेमके काय?
वाघोली येथील दहा एकर जमिनीबाबत अपर्णा वर्मा नावाच्या चार महिला पुढे आल्या होत्या. त्यातील नगर, इस्लामपूर आणि राजस्थानमधील अपर्णा वर्मा या बनावट असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले असून, त्यांनी न्यायालयात दाखल केलेले दावे मागे घेतले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी अपर्णा वर्मा पुण्यात असताना त्यांनी जमीन खरेदी केली होती. त्यानंतर त्या दुबईला गेल्या होत्या. सध्या त्या मुंबईत आल्या आहेत. आतापर्यंतच्या तपासात या अपर्णा वर्मा यांची या जमिनीवर मालकी असल्याचे दिसून येत आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.