पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या परीक्षेत त्रुटी असल्याची कबुली राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या प्रकरणी संबंधित विषय तज्ज्ञांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
यंदाच्या एमएचटी-सीईटीमध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत २१ प्रश्न चुकीचे असल्याचा प्रकार समोर आला होता. या अनुषंगाने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशात लोकप्रतिनिधींकडून सीईटीसंबंधित उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला पाटील यांनी उत्तर दिले. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी ही परीक्षा पीसीबी आणि पीसीएम या गटांसाठी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत २८ सत्रांत घेण्यात आली. २८ पैकी २७ सत्रांमध्ये ६ लाख ७७ हजार ५६० उमेदवारांची परीक्षा सुरळीतपणे पार पडली.
२७ एप्रिल रोजीच्या सकाळच्या सत्रातील मराठी, इंग्रजी, ऊर्दू या तीन भाषांमध्ये घेण्यात आलेल्या पीसीए गटाच्या परीक्षेदरम्या २७ हजार ८३७ विद्यार्थी उपस्थित होते. या उमेदवारांना गणित विषयाशी संबंधित इंग्लिश भाषांतरामधील २१ प्रश्नांमध्ये चुका असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मराठी आणि उर्दू प्रश्नांमध्ये कोणतीही त्रुटी किंवा चूक नव्हती. इंग्लिश भाषांतरामध्ये त्रुटी, चुका आढळल्याने २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ५ मे रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. ही फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. या प्रकरणी संबंधित विषय तज्ज्ञांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या अनुषंगाने राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी उत्तरात नमूद केले.