पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यात संकल्पना-सक्षमतेवर आधारित प्रश्न, बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा प्रश्नपत्रिकेत समावेश करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपत्रिकांचे प्रारुप जाहीर करण्यात आले आहे.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्या अनुषंगाने आता परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती सीबीएसईने दिली. आगामी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकतेचे स्वरुप बदलण्यात आले आहे. आता प्रश्नपत्रिकेत अधिक विश्लेषणात्मक, संकल्पनात्मक स्पष्टता विशद करणारे, तसेच विद्यार्थ्यांचे आकलन तपासणाऱ्या बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न विचारले जातील. त्यात ५० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित म्हणजे विश्लेषणात्मक प्रकारचे असतील. तर ४५ टक्के बहुपर्यायी प्रश्न एक दोन गुणांसाठीचे असतील. बदललेल्या स्वरुपाची विद्यार्थी, शिक्षक, पालकांना माहिती होण्यासाठी विविध विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे प्रारुप https://cbseacademic.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे”, मुख्यमंत्र्यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रश्नपत्रिकांच्या बदललेल्या स्वरुपाविषयी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, की पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांचे पाठांतर किंवा स्मरणशक्ती महत्त्वाची होती. मात्र नव्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांचे आकलन किंवा विद्यार्थ्यांना संकल्पना कळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक समजून घेऊन अभ्यास करावा लागेल.