पुणे : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी शहरात १० ठिकाणी चरणसेवा शिबिरे आयोजित करण्यात आली. यात १५ हजारांहून अधिक वारकऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे यांच्या पुढाकाराने ही चरणसेवा शिबिरे आयोजित करण्यात आली. यात शहरातील पारगे चौक, कसबा गणपती, कस्तुरी चौक, नानापेठ, रामोशी गेट, सह्याद्री मैदान, गंगाधाम रोड, काशेवाडी, मार्केटयार्ड आणि गंगाधाम चौक या ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये १ हजार ३७ विद्यार्थी व स्वयंसेवकांनी सेवा बजावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमात ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, संचेती महाविद्यालय, सिंहगड संस्था, रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, ब्रिजलाल जिंदाल फिजिओथेरपी, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, सूर्यदत्ता संस्था, ससून रुग्णालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, नवले शिक्षण संस्था, सेवांकुर भारत आदी संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वारकऱ्यांची फिजिओथेरपी, थकवा कमी करणाऱ्या मालिशद्वारे उपचार करण्यासोबतच मानसिक ऊर्जा वाढवणाऱ्या संवादाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.