करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यामध्ये असल्याने अजित पवार यांनी आज विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याऐवजी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नेमकी सध्या काय परिस्थिती आहे याची माहिती दिली. यावेळी त्यांनी लग्नसमारंभ, अंत्यविधी तसंच विविध कार्यक्रमांमध्ये गर्दी करणं टाळण्याचं आवाहन केलं.
“पुण्यात किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी दुख:द घटना झाल्यानंतर अंत्यविधी, दहावा, मग तेराव्याला गर्दी केली जाते. माझं जनतेला आवाहन आहे की, गर्दी टाळा. लग्नसमारंभ असेल तर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. काही कारणास्तव पुढे ढकलणं शक्य नसेल तर जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत पार पाडा. ग्रामीण भागात घरापुढे मंडप उभारुन लग्नं लावली जात आहेत. विधी कमीत कमी गर्दी करता कसे उरकता येतील याचा प्रयत्न करा,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.
आणखी वाचा- ३१ मार्च नाही पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे असेल- अजित पवार
“महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ५२ असून एकाचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. मात्र आवाहन करुनही गर्दी टळली नाही तर मात्र ते बंद करावं लागेल,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- Coronavirus: लोकल, बस, बँकांचं काय होणार ? उद्धव ठाकरेंनी केल्या १० महत्त्वाच्या घोषणा
काही निर्णय ३१ मार्च २०२० पर्यंत झाले होते, पण आता आम्ही निर्णय घेतला आहे पुढचे आदेश निघेपर्यंत सर्व निर्णयाची अमलबजावणी सुरु राहील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.