पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन – एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पूर्व भागातील वर्तुळाकार रस्त्याच्या हवेली तालुक्यातील १५ गावांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी पूर्ण झालेल्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या वर्तुळाकार रस्त्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्‍चिम असे दोन मार्ग करण्यात आले आहेत. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्यांतून जाणारा हा रस्ता ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. पूर्व भागातील प्रकल्पाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. एकूण ४२ गावांतून हा रस्ता जातो. या रस्त्याचे मार्ग निश्चित करण्यासाठीचे आदेश प्रसृत करण्यास विलंब झाला. परिणामी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या प्रकल्पाच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये हवेली तालुक्यातील १५ गावांतून हा रस्ता जातो.

या सर्व गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. वर्तुळाकार रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पश्चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील प्रकल्पाचे कामही जलदगतीने सुरू करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निधीमुळे कामांना गती

महाविकास आघाडी सरकारने चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात पुण्यातील वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादानासाठी १५०० कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी संबंधित गावांत करण्यात येणारी मोजणी, भूसंपादन आणि इतर अनुषंगिक कामांना वेग आला आहे. पुढील एका महिन्यात संपूर्ण गावांचे दर निश्‍चित करून प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हवेली तालुक्यातील प्रकल्पातील गावे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्व भागात हवेली तालुक्यातील तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, तरडे आणि आळंदी म्हातोबाची या गावांचा समावेश आहे. तर, पश्चिम भागात हवेली तालुक्यातील रहाटवडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण आणि बहुली या गावांचा समावेश आहे.