लोकसत्ता वार्ताहर
बारामती : बारामती परिसरात प्रेमीयुगुलास लुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. प्रेमीयुगुलास मारहाण करून त्यांच्याकडील ९० हजारांचे दागिने लुटण्याची घटना बारामती विमानतळ परिसरात नुकतीच घडली. प्रेमीयुगुलास लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे निर्वस्त्र करून छायाचित्रे काढल्याचे उघडकीस आले असून, अशाप्रकारे प्रेमीयुगुलांना लुटण्याची ही तिसरी घटना आहे.
बारामती परिसरात लुटमारीच्या घटना वाढल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रेमीयुगुलांना धमकावून त्यांना निर्वस्त्र करून चोरटे त्यांचे मोबाइलवर छायाचित्र काढत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (१० मे) सायंकाळी बारामती विमानतळ परिसरात एका युगुलाला लुटण्यात आले. त्यांना निर्वस्त्र करून छायाचित्र काढण्यात आली. त्यांच्याकडील ९० हजारांचे दागिने लुटून चोरटे पसार झाले.
आणखी वाचा-‘बारामती’ची मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद? काय आहे प्रकार?
चोरट्यांनी युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि कर्णफुले चोरून नेली. चोरट्यांनी चेहरा कापडाने झाकला होता. याबाबत युवतीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. यापूर्वी मुंबईतील एका युवतीला लुटण्यात आल्याची घटना घडली होती. आतापर्यंत अशा प्रकारच्या तीन घटना बारामती शहरात घडल्या आहेत. पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतची अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.