राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत यंदा शहरासह जिल्ह्य़ात एक कोटी ५२ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पुणे विभागात पाच कोटी ४७ लाख, तर राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.
यंदा वृक्ष लागवड मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्यानंतर किंवा त्याआधी लावलेल्या वृक्षांची नोंद उद्दिष्टांमध्ये घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याने, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत शहरासह जिल्ह्य़ात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वृक्ष लागवडीची, निर्माण केलेल्या रोपांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून या मोहिमेचा सातत्याने आढावा घेण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. शहरासह जिल्ह्य़ात वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ७० टक्के खड्डे घेण्यात आले आहेत. विभागातील पुणे जिल्ह्य़ाला एक कोटी ५२ लाख ३८ हजार, सातारा एक कोटी २४ लाख ७५०, सांगली ७२ लाख २९ हजार, कोल्हापूर एक कोटी तेरा लाख तीस हजार आणि सोलापूर ८५ लाख ५२ हजार असे पाचही जिल्हे मिळून एकूण पुणे विभागाला पाच कोटी ४७ लाख ४९ हजार ७५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
शाळा, दवाखाने, कार्यालये या ठिकाणी सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड
नदी काठावर वृक्ष लागवडीचे आदेश
कन्या वनसमृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी
दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या बाटलीद्वारेझाडांना पाणीपुरवठा