पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. बँक आणि पतसंस्थेतून पैसे वाटप होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांना पत्र देऊन बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. पवार यांनी शिरूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला बँकेची भोर येथील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरु होती. बँकेतून पैसे वाटप करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातही असाच पैसे वाटण्याचा प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा : मतदानाला दोन दिवस बाकी असताना डॉ. अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, म्हणाले, ‘पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक…’

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिरुर मतदारसंघात अनेक ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमधूनही पैसे वाटप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी शिरुर मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आणि आढळराव यांच्या पतसंस्थेच्या सर्व शाखांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे.